Thursday, 9 March 2017

ग्रामीण भागातील शेतकरी व महिलांसाठी जोमाने काम करेन : रीमा साठे




                                                                                    
                नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिलांचा परिचय केंद्रात सन्मान
नवी दिल्ली, ९ :  आपल्या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने उत्साह वाढला असून यापुढेही ग्रामीण भागातील शेतकरी व महिलांसाठी जोमाने कार्य करणार,असा विश्वास  महिला उद्योजिका रीमा साठे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केला. 
उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्तीराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिला उद्योजिका रीमा साठे यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी रीमा साठे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
 हॅप्पी रूट्स फुड्स अँड ब्रेवरेज इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अल्पभूधारक शेतकरी,आदिवासी शेतकरी व महिलांसाठी आपण कार्य करीत असल्याचे रीमा साठे म्हणाल्या. ग्रामीण भागात प्रत्यक्ष कार्यकरताना विविध समस्यांची जाणीव होते. सर्वांच्या सहकार्याने मार्गही निघतो हा अनुभव आहे. मात्र, आपल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले याचा खूप आनंद आहे. या पुरस्काराने नव्या जोमाने काम करण्याची उर्जा मिळाल्याचे त्या सांगतात. हे कार्य नेटाने पुढे न्यायचे असून महिला व ग्रामीण भागातील शेतक-यांसाठी उत्तमोत्तम काम करायचे असल्याचे त्या म्हणाल्या. परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत झालेला सत्कार कायम लक्षात राहील अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. 
हॅप्पी रूट्स फुड्स अँड ब्रेवरेज इंडिया प्रा.लि. उद्योग समुहाच्या माध्यमातून रीमा साठे यांनी कांदा, टोमॅटो, धान्य आणि पोल्ट्री उत्पादनाची श्रृखंला निर्माण करून थेट कृषी उत्पादन नेटवर्कींगद्वारे अल्पभूधारक शेतकरी, आदिवासी शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या उद्योग समुहाद्वारे त्यांनी विदर्भासह अन्य भागातील १२,००० अल्पभूधारक शेतकरी व आदिवासी शेतक-यांना जोडले. सामुदायिक कुक्कुटपालनाअंतर्गत १५,००० महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
रीमा साठे यांच्या प्रकट मुलाखतीचे फेसबुक व ट्वीटरवर लाईव्ह प्रक्षेपण
दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरोचिफ निलेशकुमार कुलकर्णी यांनी यावेळी रीमा साठे यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रतिष्ठीत नारी शक्ती पुरस्कार रीमा साठे यांच्या कार्याचा विविधांगी वेध घेणा-या या प्रकट मुलाखतीचे कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक आणि ट्वीटर अकाऊंटहून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. दर्शक या प्रकट मुलाखती आमच्या http://www.youtube.com/micnewdelhi या युटयुब अकाऊंटवरही बघू शकतात.     
                                                       0000  

No comments:

Post a Comment