Friday, 14 April 2017

राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी





 

नवी दिल्ली दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधीमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून  अभिवादन केले .  
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. श्री. दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, ग्रंथपाल रामेश्वर बरडे आणि वरिष्ठ लिपीक रघुनाथ सोनवने यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

डॉ. आंबेडकरांवरील लोकराज्य विशेषांक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने संसद मार्ग येथे आज महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्यअंकांचे प्रदर्शन लावून अंक वितरीत करण्यात आले.                डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावरील लोकराज्य विशेषांक या प्रदर्शनात मांडण्यात आले. संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी  येणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावरील विशेषांकाचा आशय व मांडणी उत्तम असल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.   







No comments:

Post a Comment