नवी दिल्ली, २१ : लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी, बँकाचे अधिकारी आणि
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांच्या प्रयत्नांमुळे जालना जिल्हयात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेची’ प्रभावी अंमलबजावणी होऊ शकली , या सर्वांना मी केवळ नेतृत्व दिले अशा
भावना जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी आज व्यक्त केल्या.
नागरी सेवा दिनानिमित्त
आज विज्ञानभवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी जालना जिल्हयाला गौरविण्यात आले, श्री. जोंधळे यांनी हा
पुरस्कार स्वीकारला. यानिमित्ताने महाराष्ट्र
परिचय केंद्रात कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी श्री. जोंधळे बोलत होते. परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. जोंधळे
यांचा सत्कार केला. यावेळी राज्य
शासनाच्या रोजगार
हमी योजना (नियोजन) विभागाचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे उपस्थित
होते.
यावेळी श्री. जोंधळे यांनी
उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, जालना जिल्हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून
दुष्काळाचा सामना करीत आहे. एप्रिल २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात झाली तेव्हा, जिल्हयातील प्रशासकीय अधिकारी
व लोकप्रतिनिधींनी सामुदायिक प्रयत्नातून दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी
व शेतक-यांच्या हितासाठी जोमाने कार्य करण्याचे ठरविले.
प्रधानमंत्री पीक विमा
योजनेचा लाभ जिल्हयातील शेतक-यां पर्यंत पोहचविण्यासाठी सर्वप्रथम जिल्हयातील
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांनी
शेतक-यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना या योजनेची माहिती व महत्व पटवून दिले.
जिल्हा मध्यवर्ती बँक व अन्य बँकाच्या अधिकारी-कर्मचा-यांनीही मेहनत घेतली. तसेच
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या योजनेबद्दल शेतक-यांमध्ये जनजागृती करण्याचे
काम यशस्वीपणे केले. यासर्वांच्या प्रयत्नांमुळे जिल्हयात प्रधानमंत्री पीक विमा
योजनेची प्रभावी अमंलबजावणी होऊ शकली, आपण या सर्व यंत्रनेला सक्षम नेतृत्व
देण्याचा प्रयत्न केला असे वक्तव्य श्री. जोंधळे यांनी केले. या योजनेअंतर्गत
मोठया संख्येने शेतक-यांनी सहभाग नोंदवला त्याची दखल प्रधानमंत्री पुरस्कारासाठी
घेण्यात आली.
यावेळी श्री. जोंधळे
यांनी प्रधानमंत्री पुरस्काराच्या निवड
प्रक्रियेबद्दलही उपस्थितांना माहिती दिली. परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी,
मंत्रालय मुंबई येथील अधिकारी –कर्मचारी, पत्रकार, कार्यालयाला भेट देणारे अभ्यागत यावेळी
उपस्थित होते.
उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
*********
No comments:
Post a Comment