Wednesday, 19 April 2017

शेवटच्या श्वासापर्यंत अनुवाद करीत राहील : लिना सोहोनी











                
नवी दिल्ली, 19 :  ‘अनुवाद ही माझी उत्कट आवड आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी अनुवाद करीत राहील’, अशा भावना प्रसिध्द अनुवादक लिना सोहोनी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात आज व्यक्त  केल्या.
          मराठी भाषेतील प्रसिध्द अनुवादक म्हणून सर्वश्रुत असणा-या लिना सोहोनी यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आज महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी लिना सोहोनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. कांबळे यांनी आकाशवाणी दिल्लीच्या मराठी विभागाच्या प्रमुख मृदुला घोडके यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  मुक्त पत्रकार निवेदिता मदाने वैशंपायन यांनी यावेळी लिना सोहोनी यांची प्रकट मुलाखत घेतली.
            श्रीमती सोहोनी यांनी यावेळी अनुवाद क्षेत्रातील अनुभवाबाबत सांगितले, सातव्या वर्गात असताना घरातील अडगडीच्या ठिकाणी एका कोळीयानेहे प्रसिध्द लेखक पु. ल. देशपांडे यांचे अनुवादित पुस्तक हाती लागले. त्यातूनच अनुवादित साहित्य प्रकाराची आवड निर्माण झाली. वाचनाचे वेड असल्याने घरात मिळेल ते वाचायचे. पुढे पुण्यातील शिक्षणाच्या निमित्ताने लेखक, साहित्यिक मंडळीच शिक्षक म्हणून लाभली त्यामुळे, सृजनशक्तीचा विकास झाला. बालवयात हंस मासिकात छापून आलेला पहिला अनुवादीत लेख  माझ्यासाठी प्रेरक ठरला असे श्रीमती सोहोनी सांगतात. मुंबईत आल्यावर लेखक हेनरी डेन्कर यांच्या आऊटरेजया पुस्तकाचा  मराठी भाषेत अनुवाद केला. पुण्यात या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विविध प्रकाशकांना भेटले आणि शेवटी हे माझे पहीले मराठीत अनुवादीत पुस्तक विद्रोह या नावाने प्रकाशित झाले असे श्रीमती सोहोनी यांनी सांगितले.
            लिना सोहोनी यांची  आजवर ३७  अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली असून तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांनी यावेळी अनुवादकाच्या भूमिकेतील आपले अनुभव मांडले. जगविख्यात लेखिका तस्लिमा नसरीन यांची गाजलेली लज्जा कांदबरी आणि विख्यात लेखक संजय बारू लिखीत माजी प्रधानमंत्री डॉ. मनोहन सिंह यांच्या व्यक्तीमत्वावरील द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या पुस्तकांचा अनुवाद करताना घ्यावी लागलेली काळजी आदी अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. पु. ल. देशपांडे हेच आपले आवडते अनुवादक असून स्वत: अनुवादित केलेले बेट्टी महामुडी यांचे नॉट विदाऊट माय डॉटरहे आवडते अनुवादित पुस्तक असल्याचे श्रीमती सोहोनी सांगतात. अनुवाद आणि भाषांतरामध्ये कळीचा फरक आहे. अनुवादासाठी सृजनशिलता लागते तर भाषांतरासाठी तांत्रिक ज्ञान लागते असे त्या सांगतात. वाचक हीच आपली उर्जा असून आजही सतत ६ तास लेखन करीत असल्याचे त्या सांगतात. अनुवादाशिवाय अन्य लेखनही करते मात्र अनुवाद हिच आपली उत्कट आवड असून शेवटच्या श्वासापर्यंत  अनुवाद करेल अशा श्रीमती सोहोनी सांगतात.
            यावेळी बंगांली, हिंदी , डोगरी , मराठी, इंग्रजी भाषेत अनुवाद व लेखन करणारे लेखक परिचय केंद्रात उपस्थित होते. त्यांनीही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून यावेळी लिना सोहोनी यांच्याशी हितगुज केले.
            उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितले, अनुवादक म्हणून लिना सोहोनी यांचे मराठी साहित्यातील योगदान अनन्य साधारण आहे. साहित्याच्या दिंडीत लिना सोहोनी अनुवादाची पताका सक्षमपणे खांद्यावर घेऊन मराठीचा प्रचार प्रसार करीत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
            उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर  आकाशवाणी दिल्लीच्या मराठी विभागाच्या प्रमुख मृदुला घोडके यांनी आभार मानले. 
                                                                    ००००००


           

No comments:

Post a Comment