नवी
दिल्ली, 16 : मुंबई आकाशवाणी केंद्राला व्यवस्थापनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त
झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
येथील विज्ञान भवनात आकाशवाणी वार्षिक पुरस्कार कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले. वर्ष 2014-15 या वर्षाचे पुरस्कार याप्रसंगी वितरीत करण्यात
आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व
प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी मंचावर
उपस्थित होते.
मुंबई आकाशवाणी केंद्राला सर्वोत्कृष्ट व्यवस्थापणासाठी गौरविण्यात
आले. हा पुरस्कार मुंबई आकाशवाणी केंद्राचे उप महासंचालक (अभियंता) सुधीर सोधिया यांनी
स्वीकारला. मुंबई आकाशवाणीचे काम 24 तास चालते. आकाशवाणी केंद्राचा कणा तांत्रिक
युनीट असते. मुंबई आकाशवाणी केंद्रावरून
राष्ट्रीय तसेच प्रादेशिक कार्यक्रम प्रसारित केले जातात. काही कार्यक्रम
उपग्रहवाहिणीवरूनही प्रसारित केले जातात. यासर्व प्रसारणाची जबाबदारी तांत्रिक
युनीटवर असते. आकाशवाणी केंद्राचे काम सुरळीतपणे चालावे यासाठी 24 तासाचे
व्यवस्थापन केले जाते. सर्वच कार्यक्रमांची निर्मिती, ट्रान्समिशन, रेकॉर्डिंग
याची संपूर्ण जबाबदारी ही तांत्रिक युनीटची असते. ही जबाबदारी मुंबई आकाशवाणी
केंद्र उत्कृष्टपणे पार पाडीत असल्यामुळे या केंद्राला हा पुरस्कार प्रदान करण्यात
आला.
आकाशवाणी वार्षिक
पुरस्काराचे वितरण 1974 पासून होत आहे. यातंर्गत देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या
विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणा-यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
No comments:
Post a Comment