Friday 30 June 2017

जीएसटी कर प्रणालीत सहभागी होऊन महाराष्ट्र देशाला मजबूत करणार: वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार



नवी दिल्ली दि. ३०  : देशात नव्याने सुरु होत असलेल्या ऐतिहासिक वस्तू व सेवा (जीएसटी) कर प्रणालीत सहभागी होऊन महाराष्ट्र देशाला आर्थिकरित्या मजबूत करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावेल,असा विश्वास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.
           
                येथील विज्ञान भवनात आज आयोजित जीएसटी परिषदेच्या १८ व्या बैठकीत श्री. मुनगंटीवार सहभागी झाले होते. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. श्री.मुनगंटीवार म्हणाले, उद्या १ जुलै २०१७ पासून देशात सर्वत्र जीएसटी कर लागू होत आहे. हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने या आधी प्रामाणीकपणे कर भरून देशहितात मोलाचे योगदान दिले आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा राहिला आहे. सेवा क्षेत्रात राज्याचे १९.६८ टक्के एवढे योगदान राहिले आहे तर, निर्मीती क्षेत्रात २०.५० टक्के योगदान राहीलेआहे.
                 
             देशहितासाठी नेहमीच अग्रेसर असणारा महाराष्ट्र आता देशात नव्याने सुरु होत असलेल्या जीएसटी करप्रणालीत सहभागी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ व मजबूत करण्यात पुढाकार घेईल असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
व्यापारी वर्गाला शुभेच्छा

            जीएसटी कर प्रणाली मुळे देशात नवीन आर्थिक पर्वाला सुरुवात झाली असून या नवीन पर्वासाठी राज्यातील सर्व व्यापारी वर्गाला श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या .  

No comments:

Post a Comment