नवी दिल्ली, ३ : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजनको)चा ‘पिण्याच्या पाण्याचे एटीएम’ उपक्रम देशात प्रथम ठरला आहे. या उल्लेखनीय उपक्रमासाठी वाणिज्य व उद्योग संघटनेने (असोचेम)
महाजनकोला जलव्यवस्थापनाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले आहे.
असोचेम,
केंद्रीय जलसंपदा मंत्रालय आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने येथील हॉटेल
ली मेरेडीयन येथे ‘जल
व्यवस्थापन’ विषयावर नुकतेच एका परिषदेचे आयोजन करण्यात आले
होते. यावेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात
आले. ‘जल व्यवस्थापनात देशात सर्वोत्कृष्ट सामुदायिक
प्रकल्पासाठी’ महाजनकोचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र
शासनाच्या जलसंपदा नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी यांच्या हस्ते महाजनकोच्यावतीने
दिल्लीस्थित महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल
पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ऊर्जामंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाजनकोने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी(सीएसआर)अंतर्गत नागपूर
येथील कोराडी औष्णिक केंद्र परिसरातील ६ गावांमध्ये रास्त दरात शुध्द पाणी उपलब्ध करून
देण्यासाठी ‘पिण्याच्या पाण्याचे एटीएम’ उपक्रम राबविला. स्थानिक महिला बचतगटांच्या माध्यमातून चालविण्यात येणारा
हा उपक्रम राज्यात आणि देशातही लघु उद्योगाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. महाजनकोने प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या
या ६० लाख रूपये गुंतवणुकीच्या प्रकल्पामुळे या परिसरातील ६ खेडयांमधील १४ हजार
जनतेला शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असून महिला बचत गटाच्या ५० महिलांना
रोजगार उपलब्ध झाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून
सर्व सामान्य जनतेला केवळ २५ पैसे लिटर दराने शुध्द पाणी उपलब्ध झाले. तसेच, महिलांना महिन्याकाठी १५ ते
२५ हजारांचे उत्पन्नही मिळू लागले आहे.
या यशस्वी उपक्रमानंतर आता महाजनकोने राज्यभरातील
आपल्या उर्जा निर्मीती केंद्रांशेजारील १०० खेडयांमध्ये असा उपक्रम राबविण्याची
योजना आखली आहे. या माध्यमातून २ लाख जनतेला शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होणार
असून बचत गटांच्या १ हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रफुल्ल
पाठक यांनी दिली.
०००००
No comments:
Post a Comment