Monday, 31 July 2017

आयआयएमसीच्या मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाचा आज शुभारंभ



 नवी दिल्ली, ३१ : जनसंज्ञापन व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत देशातील नामांकित भारतीय जनसंज्ञापन संस्थेच्या (आयआयएमसी) मराठी भाषेतील पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाचा मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी केद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

            केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत आयआयएमसीच्या येथील अरूणा आसफअली मार्गस्थित मुख्यालयाच्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक सभागृहात मंगळवारी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ आणि पुण्याचे खासदार अनिल शिरोळेही यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्याचवेळेस महाराष्ट्रातील अमरावती विद्यापीठातील आयआयएमसी केंद्राच्या डॉ. श्रीकांत जिचकार भवनातून गणमान्य व्यक्ती, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

              आयआयएमसी आपल्या पश्चिम (प्रादेशिक)विभागातून अमरावती येथील केंद्रात प्रथमच मराठी डिप्लोमा सुरू करीत आहे. याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे महासंचालक के.जी.सुरेश यांनी सांगितले, संस्थेच्या महाराष्ट्रातील केंद्रात स्थानिक भाषेमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरु करून मराठी भाषेला प्रोत्साहन देणे आणि  कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. मराठी मातीतील निर्भय आणि आदर्श पत्रकारितेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणा-या लोकमान्य बाळगंगाधर टीळक यांचा १ ऑगस्ट हा पुण्यतिथी दिन असल्याने या दिनाचे औचित्य साधून आम्ही हा अभ्यासक्रम सुरु करून  त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत.    
            मराठीतील डिप्लोमा अभ्यासक्रमांतर्गत वार्तांकन, संपादन, माध्यमविषय कायदे आणि आचारसंहिता, मराठी भाषा, मराठी प्रसार माध्यमांचा इतिहास आदी  पत्रकारीतेच्या  विविध पैलुंचा समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा व पत्रकारीतेतील तज्ज्ञ आणि वरिष्ठ पत्रकार या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असेही श्री. सुरेश यांनी सांगितले.   
                                                                    

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
                                       
                                                  0000000


No comments:

Post a Comment