राज्यातील रस्त्यांच्या ३० हजार
कोटींच्या कामांचा आढावा
नवी
दिल्ली, १ : सातारा- कागल या सहापदरी
रस्त्याच्या कामांसाठी ३ हजार कोटींना तर, ठाणे –भिवंडी या आठ पदरी बायपास रस्त्याच्या १ हजार कोटींच्या
कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री
नितीन गडकरी यांनी आज दिली.
परिवहन भवन येथे श्री गडकरी यांच्या
अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील रस्ते व परिवहन विषयक कामांबाबत आढावा बैठक
घेण्यात आली. या बैठकीनंतर श्री. गडकरी यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
बैठकीस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार ,
राज्यातील खासदार सर्वश्री संजय धोत्रे, धनंजय महाडीक, चंद्रकांत खैरे, संजय
जाधव,श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि केंद्रीय रस्ते वाहतूक
विभागाचे सचिव युधविरसिंह मलीक तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
आजच्या बैठकीत राज्यातील रस्त्यांच्या
३० हजार कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यात मुख्यत्वे सातारा-कागल(कोल्हापूर) हा चौपदरी रस्ता, सहा
पदरी करण्यात येणार असून यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरण यांच्यात तांत्रिकबाबींमध्ये असलेली विसंगती दूर करण्यात आली.
या रस्त्याच्या बांधकामासाठी ३ हजार कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
येत्या १ महिन्यात या संदर्भात निवीदा काढण्यात येतील आणि ३ महिन्यात कामाला
सुरुवात करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.
ठाणे –भिवंडी आठपदरी बायपास रस्त्याच्या कामांची १५ दिवसात निवीदा
मुंबई व नाशिकसाठी महत्वाचा असणारा
ठाणे –भिवंडी या आठपदरी बायपास रस्त्याच्या बांधकामासाठी १ हजार कोटी रूपयांना
मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात येत्या १५ दिवसात निवीदा काढण्यात येणार असून ३
महिन्यात कामाला सुरुवात होणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.
मुंबई –गोवा महामार्गावरील पुलांच्या कामाला लवकरच सुरुवात
बैठकीत
मुंबई-गोवा या १८ हजार कोटींच्या महामार्गाचा आढावाही घेण्यात आला. या
महामार्गासाठी भूमी अधिग्रहणाबाबत तांत्रिक अडचणी येत होत्या. आज या संदर्भात
मार्ग काढण्यात आला त्यानुसार या महामार्गावर पुलांच्या कामासाठी भूमी अधिग्रह
झाले तिथे पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद-जालना –जळगाव
महामार्गास मंजुरी
विश्व प्रसिध्द
अजिंठा येथे जाणारा औरंगाबाद-जालना-जळगाव महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरण करणे
शक्य आहे तर काही ठिकाणी चौपदरीकरण होऊ
शकत नाही , याबाबत बैठकीत चर्चा झाली. या संदर्भात योग्य मार्ग काढून
औरंगाबाद-जालना –जळगाव महामार्गाच्या बांधकामांस आज मंजुरी देण्यात आल्याचे श्री.
गडकरी यांनी सांगितले.
जालना–चिखली महामार्गासाठी राज्यशासनाचा
डीपीआर स्वीकारणार
महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामासाठी राष्ट्रीय रस्ते विकास
प्राधिकरण स्वत: सविस्तर प्रकल्प अहवाल(डीपआर) तयार करते. जालना-चिखली या चौपदरी
महामार्गाबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला डीपीआर
मान्य करून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.
वार्षिक योजनेतून बांधण्यात येणा-या
रस्त्यांबाबत चर्चा
राज्यातील शहरांमधून जाणा-या रस्त्यांची वार्षिक
योजनेतून करावयाच्या ११ हजार कोटींच्या कामांबाबत यावेळी चर्चा झाली. प्रत्यक्ष
योजना आणि मंत्रालयाच्यावतीने या रस्त्यांच्या कामांना देण्यात आलेली मंजुरी यात
तफावत होती. यासंदर्भात उचित मार्ग काढून लवकरच या रस्त्यांच्या बांधकामास सुरुवात
करण्याचाही निर्णय झाला.
टोल नाक्यांच्या
कायदेविषयक बाबींवर चर्चा
राज्यातील मनसर, खलासा, अमरावती ,मोर्शी या टोल
नाक्यांबाबत येत असलेल्या कायदेविषयक अडचणींवर या बैठकीत चर्चा झाली. यातील अडचणींवर लवकरच
मार्ग काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
राज्यात ३ लाख
कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे उदिष्टय
आहे. यातील दीड लाख कोटी रूपयांच्या रस्ते बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. यापैकी
मराठवाडा विभागात ७५ हजार कोटींच्या कामांपैकी ६५ हजार कोटींच्या कामांना मान्यता
देण्यात आली असून ४५ हजार कोटींच्या कामांना सुरुवात झाल्याचे श्री. गडकरी यांनी
सांगितले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
0000000
No comments:
Post a Comment