Saturday, 12 August 2017

महाराष्ट्र परिचय केंद्राचे माजी संचालक रा.मो. हेजीब यांचे निधन





नवी दिल्ली, दि. 12 : महाराष्ट्र परिचय केंद्राचे माजी संचालक तथा दिल्ली सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष रामकृष्ण मोरेश्वर हेजीब(74) यांचे आज सायंकाळी येथील फोर्टीस रूग्णालयात हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी नीना आणि मुलगी तनुजा असा परिवार आहे.
        श्री. हेजीब यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक म्हणून १.९.१९९४ ते ३१.१०.२००० या कालावधी दरम्यान कार्यभार सांभाळला. मराठी नाटय महोत्सव, चित्रपट महोत्सव आदी आयोजनांतून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिल्लीत मराठी संस्कृती जतन व संवर्धनात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या योगदानामुळे दिल्लीतील मराठी सांस्कृतिक दूत म्हणून त्यांची ख्याती होती. निवृत्तीनंतर त्यांनी सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातूनही  महाराष्ट्र दिन महोत्सव, गणेशोत्सव, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जयंती,  दिवंगत केंद्रीय मंत्री वसंत साठे जयंती, कोजागिरी पोर्णीमा आदी कार्यक्रमाचे आयोजनात त्यांचा पुढाकार असायचा. श्री. हेजीब यांचा जन्म पुणे येथे झाला. ते १९४८-४९ साली दिल्लीत आले.

                    श्री.हेजीब यांना दिल्लीतील मराठी माणूस कायम आठवणीत ठेवतील
                                                                                               केंद्रीय मंत्री  प्रकाश जावडेकर                                             
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी श्री. हेजीब यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले. त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले, श्री. हेजीब हे दुर्मीळ व्यक्तीमत्वाचे धनी होते. दिल्लीत मराठी संस्कृतीच्या जतन व संवर्धनाच्या दृष्टीने नव-नवीन कल्पना व कार्यक्रमांसाठी ते सदैव तत्पर व आग्रही असत. त्यांच्या अनन्यसाधारण योगदानामुळे दिल्लीतील  मराठी माणूस त्यांना नेहमीच आठवणीत ठेवतील .
                   श्री. हेजीब यांच्या निधनाने दिल्लीतील मराठी व अमराठी जनतेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.     सोमवार , दिनांक १४ ऑगस्ट २०१७ रोजी  श्री . हेजीब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
             
  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :


                                                           00000

No comments:

Post a Comment