Wednesday 30 August 2017

महाबळेश्वर सैल यांना ‘सरस्वती’ पुरस्कार प्रदान



 नवी दिल्ली, ३० : कोकणी साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी साहित्यिक महाबळेश्वर सैल यांना केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते आज साहित्यातील मानाच्या सरस्वती पुरस्काराने गौरविण्यात आले.
          येथील जनपथ मार्गावरील राष्ट्रीय संग्रहालयात के.के. बिरला फाउंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरीत करण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्ष शोभना भारतीय, सरस्वती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष  न्या. आदर्श सेन आनंद, फाउंडेशनचे संचालक डॉ. सुरेश ऋतुपर्ण यावेळी मंचावर उपस्थित होते.           
के.के. बिरला फाउंडेशनच्यावतीने राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचित समाविष्ट भारतीय भाषांतील उत्तम साहित्यकृतीसाठी वर्ष १९९१ पासून सरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. वर्ष २०१६ च्या या पुरस्कारासाठी कोकणी साहित्यिक महाबळेश्वर सैल यांच्या हावठण या कांदबरीसाठी सरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, प्रशस्तीपत्र, प्रतीक चिन्ह आणि १५ लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कर्नाटकातील कारवार जिल्हयातील माजळी या गावी श्री. सैल यांचा जन्म झाला. श्री. सैल             यांचे कोकणीसहित मराठी भाषेतही मोलाचे योगदान आहे. मराठी भाषेत त्यांची चार नाटके आणि एक कादंबरी प्रसिध्द आहे. श्री. सैल यांच्या युगसांवर या कोकणी कादंबरीचेतांडवया शिर्षकाने मराठीत रूपांतर झाले. मराठीतील श्रेष्ठ कादंब-यांमध्ये तिची गणना होते. १९७२ मध्ये श्री. सैल यांची पहिली कथा  आचार्य अत्रे यांच्या नवयुग मध्ये प्रसिध्द झाली होती.
१९९१ मध्ये पहिला सरस्वती पुरस्कार हिंदी साहित्यातील योगदानासाठी डॉ. हरिवंशराय बच्चन यांना प्रदान करण्यात आला. मराठी साहित्यातील योगदानासाठी  दिवंगत साहित्यिक विजय तेंडुलकर (१९९३) यांना तर प्रसिध्द नाटककार महेश एलकुंचवार (२००२) यांना प्रदान करण्यात आला आहे. आज २६ वा सरस्वती सम्मान  महाबळेश्वर सैल यांना प्रदान करण्यात आला.                                                
                                   ००००००

No comments:

Post a Comment