Friday 4 August 2017

एअर मार्शल हेमंत भागवत ; वायू सेनेच्या प्रशासन विभागाचे प्रमुख


     

नवी दिल्ली, दि. 4 : एअर मार्शल, अतिशिष्ट(एव्हीएसएम), विशिष्ट(व्हीएम) सेवा पदक प्राप्त हेमंत नारायण भागवत यांची भारतीय वायू सेनेच्या प्रशासकीय विभागाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. भागवत हे मुळचे रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथील आहेत.

            एअर मार्शल भागवत यांनी १ ऑगस्ट २०१७ रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते वायू सेनेच्या मुख्यालयात  महासंचालक (वर्क अँड सेरेमोनीयल) पदाचा पदभार सांभाळत होते. पॅराट्रुपींग मधील महत्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वायू सेना पदकाने त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच, वायुसेनेतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अतीविशिष्ट सेवा पदक व विशीष्ट सेवा पदाकानेही गौरविण्यात आले आहे.    

            एअर मार्शल भागवत हे वायू सेनेच्या विविध ऑपरेशनल बेस मध्ये ७ वर्षांपर्यंत हवाई वाहतूक नियंत्रक अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी, श्री. भागवत यांनी पॅराशूट जंप इन्स्ट्रक्टर म्हणून १५ वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. आग्रा येथील पॅराट्रुप्स प्रशिक्षण केंद्राचे ते ५ वर्षांपर्यंत मुख्य प्रशिक्षक होते. आकाशगंगा स्काय डायव्हींग संघाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. अमेरीका, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि सियाचेल्स येथे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरा अभ्यासामध्ये सहभाग घेतला आहे.

            श्री भागवत यांनी वेलींगटन  येथून संरक्षण सेवेतील पदवी मिळवली आहे. हैद्राबाद येथून त्यांनी हायर एअर कमांड विषयक अभ्यास केला तर सिकंदराबाद येथून संरक्षण व्यवस्थापकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. मद्रास विद्यापीठातून त्यांनी सैनिकी डावपेच विषयक अभ्यासक्रमात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले तर उस्मानिया विद्यापीठातून एमफील पूर्ण केले आहे.      

   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
                                       0000000



No comments:

Post a Comment