नवी
दिल्ली, १२ : बदलत्या काळाची कास धरत राज्यशासनाची प्रतिमा
उंचविण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने नव माध्यमांचा प्रभावीपणे वापर करण्यात
येतो, ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव यांनी आज व्यक्त
केले.
श्री. जाधव यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दैनिक पुढारी चे दिल्लीस्थित
सहयोगी संपादक श्रीराम जोशी, वरिष्ठ पत्रकार विजय सातोकर, परिचय केंद्राच्या जनसंपर्क
अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार
यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. जाधव यांच्या सोबत झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी
प्रसार माध्यमांसह विविध विषयांवर आपली मत मांडली. यावेळी, परिचय केंद्राच्या कामांबाबतही
माहिती ही जाणून घेतली.
आधुनिक माध्यमांच्या युगाची पाऊले ओळखून कार्यालयाने समाज माध्यमांचा
प्रभावी उपयोग केला असल्याचे श्री. जाधव यावेळी म्हणाले. परिचय केंद्राच्या अधिकृत
समाज माध्यमांद्वारे प्रसुत होणारी माहिती प्रसार माध्यमांसाठी उपयुक्त ठरते. परिचय
केंद्राच्यावतीने शासनातील जनसंपर्क विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम
स्तुत्य आहे. याच बरोबर दिल्ली स्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क
व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीतही या
कार्यालयाचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे श्री. जाधव म्हणाले. दैनिक पुढारीच्या वाटचाली
विषयी व नाविन्यपूर्ण उपक्रमांविषयी ही त्यांनी यावेळी माहिती दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात
येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी
साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी श्री. जाधव यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राची प्रकाशने श्री. जाधव यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय
तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. जाधव यांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
00000
No comments:
Post a Comment