Wednesday 6 September 2017

‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत राज्यातील प्रकल्पांच्या अंमलबंजावणीचे केंद्राकडून निर्देश









नवी दिल्ली, 6 : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून तयार होणा-या राज्यातील पुणे, सोलापूर आणि कल्याण डोंबिवली येथील प्रकल्पांच्या शीघ्र अंमलबजावणीचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत.
        स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध राज्यांमधे प्रस्तावित असलेल्या नागरीकांच्या जीवनावर परिणाम करणा-या सार्वजनिक व खाजगी भागीदारीच्या प्रकल्पांची लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ३० ऑगस्ट २०१७ रोजी प्रगती कार्यक्रमांतर्गंत स्मार्ट सिटी योजनेचा आढावा घेतला. याचाच आढावा घेत सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी यासंदर्भात संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या प्रकल्पांच्या शीघ्र अंमलबजावणीचे निर्देश  दिले आहेत.             
 स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्यात देशातील २० व अन्य निवडक शहरांमधे राज्यातील पुणे शहरातील २३५ कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांतर्गत शहरातील नद्यांसमोरील क्षेत्र आणि वारसा संग्राहालयाच्या विकासाची कामे करण्यात येणार आहे. तसेच, पुणे शहरात १७० कोटीं गुंतवणुकीचा    इलेक्ट्रीक बसेसचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सोलापूर शहरात ४९ कोटींच्या गुंतवणुकीतून सिध्देश्वर तलाव आणि वारसा स्थळांच्या विकासाची कामे करण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवली शहरात ४२७ कोटींच्या गुंतवणुकीतून  कल्याण रेल्वे स्थानकाच्या सुधारणेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 
                  मागील वर्षी (२०१६) जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान घोषित देशातील ६० शहरांमधील २६१ प्रकल्प यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत ३१ हजार ११२ कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच  सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून राज्य व केंद्र शासीत प्रदेशात होणा-या ३२ हजार ४१० कोटी  गुंतवणुकीच्या  ३७०  प्रकल्पांची लवकर अमंलबजवाणी  करण्याचेही निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.  

                                                                00000   

No comments:

Post a Comment