नवी दिल्ली : संत ज्ञानेश्वर जागतिक दर्जाचे तत्वज्ञ असल्याचे मत एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केले.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यावेळी डॉ. कराड बोलत होते. यावेळी विश्ववशांती केंद्राचे सल्लागार तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाने, कर्नल तांबडे, ज्येष्ठ पत्रकार अरूण कोरे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, माध्यम प्रतिनिधी, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी परिचय केंद्राचे उपसंचालक श्री कांबळे यांनी डॉ. विश्वनाथ कराड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यासह श्री कांबळे यांनी डॉ. एस.एन.पठाण, डॉ. सुधीर गव्हाने, कर्नल तांबडे आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण कोरे यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी डॉ. कराड म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहून महाराष्ट्र, देशासह जगालाच नवीन अध्यात्माचा मार्ग दिलेला आहे. अध्यात्माची नवीन दिशाच ज्ञानेश्वरामुळे मिळाली असल्याने ख-या अर्थाने संत ज्ञानेश्वर हे जागतिक दर्जाचे तत्वज्ञ होते. त्यांचा भारतीय मानव समाजावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.
आपण ज्या शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत त्या आपल्या हातून घडत गेल्या आहेत, आपण केवळ माध्यम होतो, असे डॉ. कराड यांनी यावेळी विनम्रपणाने सांगितले. त्यांनी विश्वशांती स्तुपांच्या बांधकामाविषयी सांगितले, या स्तूपामध्ये जगभरातील तत्ववेत्त्यांची ग्रंथसंपदा व त्यांचे पुर्णाकृती पुतळे असणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी श्री. कराड यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने डॉ. कराड यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन डॉ. कराड यांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment