Monday, 9 October 2017

महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना वयोश्रेष्ठ सम्मान


 








नवी दिल्ली 9 : महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज वयोश्रेष्ठ सम्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या मंगला बनसोडे, नागपूर जिल्ह्याचे डॉ.महादेवराव मेश्राम, आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुलकर्णी यांचा समावेश आहे.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने वयोश्रेष्ठ सम्मान 2017 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री क्रिष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, सचिव जी. लता कृष्णराव या उपस्थित होत्या.
सृजनात्मक कलेसाठी मंगला बनसोडे यांचा सन्मान
सृजनशील कलेच्या क्षेत्रात श्रीमती मंगला बनसोडे यांना आज वयोश्रेष्ठ सम्मान प्रदान करण्यात आला. श्रीमती बनसोडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका लोकनाटय तसेच लावणीला समर्पीत कुटूंबात झाला. त्यांची ही पाचवी पीढी आहे जे लोकनाट्य तसेच लावणी सादर करते. श्रीमती बनसोडे या लावणी आणि तमाशाच्या माध्यमातून लोकजागृती, सामाजिक संदेश पोहोचविण्याचे काम करतात. वयाच्या 7 व्या वर्षापासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. लावणीचे संरक्षण तसेच संवर्धन गरजेचे असून या माध्यमातून सकारात्मक सामाजिक संदेश देण्याचा आपला सदैव प्रयत्न राहील तसेच आपण जीवंत असेपर्यंत ही कला जोपासू असे त्यांनी पुरस्कार प्राप्तीनंतर व्यक्त केले.  
डॉ.महादेवराव मेश्राम यांना जीवन गौरव पुरस्कार
        डॉ. महादेवराव मेश्राम यांना त्यांच्या आरोग्य सेवेत अतुलनिय योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री मेश्राम हे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालूक्यातील आहेत. त्यांनी नागपूरातील रोबर्टसन मेडीकल स्कूलमधून आरोग्य विषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केला. आणि 1958 पासून आरोग्य अधिकारी म्हणून रूजु झाले होते, त्यांनी रुग्णांना प्राधान्याने तपासले आहे. यासह आपत्ती काळात पुरग्रस्त क्षेत्रातील पिढीत लोकांसाठी, कुष्ठ रोग्यांसाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान महाराष्ट्र शासनाने ही केला असून त्यांना 1982-85 मध्ये प्रशस्ती पत्राने सन्मानित करण्यात आले आहे. ते आजही रूग्णांना  तपासतात. त्यांच्या या सर्व कामाचा सन्मान म्हणुन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
मनोरमा कुलकर्णी यांचा क्रीडा क्षेत्रासाठी वयोश्रेष्ठ सन्मान
मनोरमा कुलकर्णी या कोल्हापूरच्या आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून 35 वर्ष सेवा दिली आहे. त्यांना खेळाची अंत्यत आवड आहे. विशेषत: धावणे या खेळात त्यांनी निवृत्तीनंतर विशेष लक्ष दिले. धावण्यात त्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी 1500 मीटर मैराथनमध्ये आपले कौशल्य दाखविले आहे. आतापर्यंत त्यांना अंतराराष्ट्रीय आयोजनात 1 रजत, 2 कांस्य, राष्ट्रीय स्तरातील स्पर्धेत 25 स्वर्ण, 4 रजत,3 कांस्य आणि राज्यस्तरावील स्पर्धेत 13 स्वर्ण, 2 रजत,  पदके जींकली आहेत.  श्रीमती कुलकर्णी सध्या 71 वर्षाच्या असून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील या विशेष कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते वयोश्रेष्ठ सम्मान’  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 यावर्षी वयोश्रेष्ठ सम्मान हा विविध 11 श्रेणीमध्ये 22 लोकांना प्राप्त झालेला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र हे आहे.

No comments:

Post a Comment