नवी दिल्ली दि.16 : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत
महाराष्ट्राला ठिबक सिंचन कार्यक्रमासाठी 440
कोटी रुपयाचा निधी मिळावा अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, अशी
माहिती राज्याचे कृषी सहसंचालक श्री.
शिरीष जमदाडे यांनी दिली आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत देशातील ठिबक सिंचन कार्यक्रमाचा आढावा केंद्र
शासनाच्या कृषी विभागाच्या सहसचिव श्रीमती निरजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्राच्या
ठिबक सिंचन कार्यक्रमाची माहिती श्री. जमदाडे यांनी सादर केली व 440 कोटी
रुपयांच्या निधीची मागणी केली.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये महाराष्ट्राला ठिबक
सिंचन कार्यक्रमासाठी 620 कोटी 47
लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, यातील केंद्र शासनाचा हिस्सा हा 380 कोटी रुपयांचा आहे व उर्वरित हिस्सा हा राज्य शासनाचा आहे.
महाराष्ट्रात ठिबक सिंचनामध्ये मोठ्या
प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत
3 लाख शेतक-यांना ठिबक सिंचन
कार्यक्रमाचा लाभ देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नाशिक, जळगांव, सोलापूर
, पुणे आदी जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचनाचे
मोठे काम झाले असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही ठिबक सिंचन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात
येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्राने 60 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केंद्र
शासनाकडे केली आहे. 380 कोटीचे मंजूर अर्थ
सहाय्य व 60 कोटी रुपयांची अतिरिक्त अनुदान असे 440 कोटी रुपयांचा निधी लवकरात
लवकर मिळावा, अशी विनंती केंद्र शासनाकडे
करण्यात आली आहे. मंजूर अनुदानापैकी महाराष्ट्राला 190 कोटी रुपये अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आल्याची
माहिती श्री.जमदाडे यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment