Monday, 2 October 2017

महाराष्ट्राला “स्वच्छता ही सेवा”पुरस्कार स्वच्छतेत ठरले देशातील सर्वोत्कृष्ट राज्य













नवी दिल्ली, 2 :   स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला स्वच्छता ही सेवा या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत दिवस या विशेष संमारभात हा गौरव करण्यात आला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
            येथील विज्ञान भवनात आज  गांधी जंयतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस व स्वच्छ भारत अभियानाचा तिसरा वर्धापन दिन तसेच स्वच्छता ही सेवा पंधारवाड्याचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास  केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री सुश्री उमा भारती, गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीप सिंह पुरी, पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री श्री एस एस अहलुवालिया  व राज्यमंत्री श्री रमेश चंदप्पा जिगाजीनागी यावेळी उपस्थित होते.
            महाराष्ट्राने स्वच्छतेच्या बाबतीत शहर व ग्रामीण भागात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल या समारंभात घेण्यात आली. संकल्प से सिध्दी या पंधरवाड्यात राज्याने जे विविध उपक्रम राबविले व जनजागृती केली त्यामुळे देश पातळीवर सर्वाधिक गुण महाराष्ट्राला मिळाले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व नगर विकास विभागाने शहर व ग्रामीण भागात स्वच्छ महाराष्ट्रासाठी राबविलेला उपक्रम देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव रुचेश जयवंशी  व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर व मिशन प्रमुख उदय टेकाळे यांना राज्यमंत्री पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री श्री एस एस अहलुवालिया   व गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.



साताऱ्याच्या प्रशांत पांडेकर ला शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार
स्वच्छेतेसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत सातारच्या प्रशांत पांडेकर यांनी दिग्दर्शित व निर्मित केलेली दृष्टी ही शॉर्ट फिल्म सर्वोत्कृष्ट ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रशांत पांडेकरला स्वच्छता ही सेवा या पुरस्काराने गौरविण्यात आले.
            स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी भागात उल्लेखनीय काम करणा-या शाळा व महाविद्यालयांनाही यावेळी गौरविण्यात आले. अमरावतीच्या प्रा.राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयास स्वच्छतेसाठी केलेल्या जनजागृती बद्दल स्वच्छता ही सेवापुरस्काराने गौरविण्यात आले. गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीप सिंह पुरी यांचा हस्ते महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील रोझलॅण्ड गृहनिर्माण सोसायटीला त्रीस्तरीय  कचरा विलगीकरणाबद्दल स्वच्छता ही सेवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

No comments:

Post a Comment