Friday, 3 November 2017

महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत दिल्लीत लवकरच बैठक : कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर





                             
नवी दिल्ली, ३ : राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्याच्या दृष्टीने दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिली.
           केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्यावतीने आयोजित वर्ल्ड फुड इंडियाच्या पार्श्वभूमीवर येथील महाराष्ट्र सदनात आयोजित बिजनेस टू बिजनेस परिषदेत श्री. फुंडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी  पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाशिव खोत, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार उपस्थित होते.
        श्री. फुंडकर म्हणाले, शेतक-यांनी उत्पादित केलेल्या कच्चा मालावर प्रक्रिया करून या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्यशासन पूर्ण सहकार्य करीत आहे. केंद्र शासनाच्या मदतीने काही विषय मार्गी लावण्यासाठी राज्यशासन सकारात्मक असून या उद्योगासमोरील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री, वाणीज्य व उद्योग मंत्र्यासोंबत बैठक आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. अन्न प्रक्रिया युनीटला प्रोत्साहन देण्यासाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतक-यांचे  उत्पादन वाढविणे व शेतमालावर  प्रक्रिया करून त्यास योग्य दर मिळवून  देण्यात येत आहे.
                  
                                     २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करणार
      शेतक-याने पिकवीलेल्या मालावर जागीच प्रक्रिया होऊन या मालाचे पॅकींग करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमाल पाठविण्यासाठी राज्य शासनाने कार्यक्रम आखला आहे. यासह शेतक-यांच्या हिताच्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणी करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत  देशातील शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे दिलेले ध्येय पूर्ण करू असा विश्वास श्री. फुंडकर यांनी व्यक्त केला. या ध्येयपुर्तीसाठी शेतकरी व उद्योजक यांनीही शासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   
         यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध योजनांचे सादरीकरण केले. कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत राज्य शासनाच्या योजना व उद्योजकांना असलेली संधी याबाबत सादरीकरण केले.
             लातूर येथील कृषी विकास एक्सपोर्टसचे तुकाराम येलाले, नासिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील कोठूरे येथील ग्रेप एक्सपोर्ट असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे,  पुणे यथील महा कोल्ड स्टोरेज असोशिएशनचे उपाध्यक्ष राजकिशोर केंढे आदींनी यावेळी प्रश्न विचारले व त्यास मंत्रीमहोदय आणि वरिष्ठ अधिका-यांनी उत्तरे दिली.    
                                        
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                             http://twitter.com/micnewdelhi                       
000000




                                                                    


No comments:

Post a Comment