Thursday, 16 November 2017

उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्राचा राष्ट्रीय सन्मान



सांघिक प्रयत्नांमुळेच राज्यातील आरोग्य सेवा उत्तम : डॉ. दिपक सावंत

नवी दिल्ली, दि.16 : बाल व माता मृत्यूदारात झालेली घट, शिव-आरोग्य टेलीमेडिसिन, बाईक ॲम्ब्युलन्स यासह आरोग्य क्षेत्रात योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राला देशातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणाऱ्या राज्याचा सन्मान मिळाला आहे. सांघिक प्रयत्नांमुळेच राज्याला हे यश मिळाल्याच्याभावना, राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यक्त केल्या.

इंडिया टुडे माध्यम समुहाच्या वतीने येथील द ग्रॅड हॉटेल मध्ये आयोजित स्टेट ऑफ द स्टेटपरिषदेत आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा सन्मान करण्यात आला. देशात सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी हा पुरस्कार स्विकारला. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्रसिंह यांच्यासह विविध राज्यांचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाली असून यामुळे बाल व माता मृत्यूदारत घट झाली आहे. विशेषत: आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यात बाल मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. पुरस्कारासाठी असलेला हा मुख्य निकष राज्याने पूर्ण केला आहे. 2015 मध्ये राज्यात सुमारे 96 टक्के संस्थात्मक बाळंतपणाच्यावेळी प्रशिक्षित सहाय्यकांनी सहभाग घेतल्याची नोंद पुरस्कारासाठी घेण्यात आली. देशाच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण 14 टक्क्यांनी जास्त आहे. 2016 मध्ये राज्यात प्रत्येक जिल्हा रूग्णालयात सरासरी 280 बेड असल्याची नोंदही या पुरस्कारासाठी घेण्यात आली. हे प्रमाण राष्ट्रीयस्तरावरील 73 टक्के या सरासरीपेक्षा जास्त आहे, हे उल्लेखनीय.

याशिवाय ‘शिव-आरोग्य टेलिमेडिसिन सेवे’ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी झाली असून याचा फायदा आदिवासी भागातील रूग्णांनी घेतला आहे. मुंबई येथून विविध क्षेत्रातील 25 वैद्यकीय तज्ज्ञांकडून राज्याच्या दुर्गम भागातील रूग्ण व स्थानिक डॉक्टरांना या सेवेच्या माध्यमातून थेट मार्गदर्शन करण्यात येते. राज्य शासनाने यावर्षी पासून ‘बाईक ॲम्ब्युलन्स’ ही अभिनव आरोग्य सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 1000  रूग्णांनी लाभ घेतला आहे. मुंबईत  10 बाईक ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत. ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा’च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील बालकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासर्व बाबींची नोंद पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तसेच, ‘महात्मा फुले जन आरोग्य सेवेची उत्कृष्ट अंमलबजावणीची नोंदही या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्याच्या अर्भक मृत्यू दर 21 वरून 19 एवढा कमी झाल्याची नोंदही घेण्यात आली आहे.

सांघिक प्रयत्नांमुळेच राज्यातील आरोग्य सेवा उत्तम

आरोग्य सेवेसाठी देशपातळीवर झालेला सर्वोच्च सन्मान हा राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे. स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या आशा वर्कर्स, आरोग्य सेविका, डॉक्टर पासून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच सांघिक प्रयत्नांमुळेच महाराष्ट्र आरोग्य सेवेत देशात सर्वोत्कृष्ट ठरल्याच्या भावना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी व्यक्त केल्या. 

     महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                            http://twitter.com/micnewdelhi
000000

No comments:

Post a Comment