नवी दिल्ली, ४ : ‘वर्ल्ड फुड इंडिया’ मधील महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील गुंतवणुकदारांच्या शिष्टमंडळाने कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर , पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या सोबत महाराष्ट्रात गुंतवणुकीबाबत आज सकारात्मक चर्चा केली.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने इंडिया गेट लॉनवर आयोजित वर्ल्ड फुड इंडिया प्रदर्शनात महाराष्ट्र दालनास आज देश विदेशातील गुंवणुकदारांनी भेट दिली. यावेळी मंत्री त्रयी श्री.फुंडकर, श्री.जानकर आणि श्री. खोत यांच्या सोबत या शिष्टमंडळाची बैठक झाली.
सिल्ड एअर आणि रिचग्रॅवीस या अमेरिकन कंपन्या, स्पेनमधील काँगल्डस नवारा याशिवाय ओएसआय विस्टा ग्रुप, युम ब्रांड, शरफ ग्रुप या विदेशी कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रीमहोदय तथा राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत राज्यात उद्योग उभारणीबाबत विविध विषयांवर चर्चा केली त्यास राज्य शासनाच्यावतीने सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
भारतातील ट्रांस इंजिनीअर इंडिया प्रा. लि. च्या कृषी विभागाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सितिकांथा चौधरी, कारगील इंडिया कंपनीचे अध्यक्ष सिराज चौधरी, श्रीनी फुड पार्क प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनील कुमार श्रीवास्तव, एल.एल. लॉजिस्टीक प्रा.ली. च्या कृषी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल आणि एजीटी फुड इंडिया प्रा. लि. च्या वरिष्ठ अधिका-यांनीही मंत्रिमहोदयांशी राज्यात उद्योग उभारणीबाबत विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दालनास भेट दिली व याठिकाणी प्रदर्शीत करण्यात आलेल्या विविध स्टॉल्सच्या प्रतिनिधींशीही आस्थेवाईकपणे चौकशी केली व माहिती जाणून घेतली. राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनीही महाराष्ट्र दालनास भेट दिली.
No comments:
Post a Comment