नवी दिल्ली, दि. 21 : प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष 2017 साठी मराठी साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला आहे. प्रसिध्द अनुवादक सुजाता देशमुख यांच्या ‘गौहर जान म्हणतात मला !’ या पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला.
रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातील 24 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावाची घोषणा केली. प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘ बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.
‘बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिडीतील नवा कवितासंग्रह आहे. गावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात पाच विभाग आहेत. 68 कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे. प्रस्तुत संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधले आहे. जन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने सांगीतले आहे. जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्कर, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडय़ा, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात. माती, रेत यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते. ‘उजळमाथ्यानं भूमिपुत्र’ या भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं. उंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळय़ांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे ही या काव्यसंग्रहात सूचकपणे आविष्कृत केले आहे.
श्रीकांत देशमुख हे मराठी साहित्यविश्वाला कवी म्हणून परिचित आहेत. ‘बळीवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावे ते आम्ही’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. ‘महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ’, ‘कुडाळवाडी भूषण शिवराय’ हे वैचारिक ग्रंथलेखन तसेच काही ग्रंथांची संपादनेही त्यांनी केली आहेत. ‘पडझड वा-याच्या भिंती’ हा त्यांचा ललितगद्याचा संग्रहही प्रसिध्द आहे.
सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2018 रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता.
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला याचा अत्यानंद : सुजाता देशमुख
सुजाता देशमुख अनुवादित ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. विक्रम संपथ लिखित ‘माय नेम इज गौहर जान’ या इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना सुजाता देशमुख म्हणाल्या, ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा अत्यानंद झाला आहे. लेखक हा पुरस्काराची अपेक्षा न करता लिहीत असतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार ही माझ्या अनुवादासाठी मोठी पावती असून यानिमित्ताने ‘गौहर जान म्हणतात मला’ हे पुस्तक पुन्हा वाचकांसमोर येणार आहे.’
एक साक्षेपी संपादक, अनुवादक आणि पत्रकार म्हणून श्रीमती सुजाता देशमुख यांचा लौकिक आहे. त्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या. ’मिळून सार्या्जणी’ या मासिकाचं संपादकपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. , ’गौहरजान म्हणतात मला!’, ’माझंही एक स्वप्न होतं’, ’बाइकवरचं बिर्हाुड’, ’तिची मोहिनी’, ’नीलची शाळा’, ’देश माझा, मी देशाचा’ (श्री. लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र), दहशतीच्या छायेत’ यांसह आदी अनुवादित पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.
अनुवादीत पुस्तकाच्या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असून पुढीलवर्षी(२०१८) साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मराठी साहित्यातील अनुवादित पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक अनुराधा पाटील, मकरंद साठे आणि डॉ. नरेंद्र जाधव यांचा समावेश होता.
०००००
No comments:
Post a Comment