महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय दिव्यांगजन
पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. ३ : महाराष्ट्रातील २ व्यक्ती आणि ३ संस्थांना आज राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण
मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने जागतिक अपंग दिना निमित्त राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार
वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांगजणांसाठी उल्लेखनीय
कार्य करणाऱ्या संस्था,
उत्कृष्ट दिव्यांगजन कर्मचारी, दिव्यांगजणांसाठी कार्य
करणाऱ्या संशोधन
संस्था अशा एकूण १४ श्रेणीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व
सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर,विजय सांपला आणि रामदास आठवले तसेच वरिष्ठ अधिकारी
यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रणय बुरडे, गौरी गाडगीळ यांच्यासह ‘ई टी सी’, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड
इंडिया (नॅब) आणि ‘द जळगाव पीपल्स को- ऑप बँक लि.’ या संस्थाना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या
क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुंबई येथील प्रणय बुरडे व पुणे येथील गौरी गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अपंगत्वावर मात करत प्रणय बुरडे यांनी स्वबळावर रोजगार मिळवला असून स्वत:ची ओळख
निर्माण केली आहे. प्रणय जन्मत:च डाऊन सिंड्रोम आजारा ने ग्रस्त . आई प्रसुना आणि वडील
पुरुषोत्तम बुरडे यांनी खचून न जाता प्रणयला स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा केली. प्रणय पहिली असताना सामान्य मुलांच्या शाळेतून त्याला पायउतार
व्हावे लागले हा मोठा आघात सहन करून आई वडीलांनी त्याला नागपूर येथील मे फ्लॉवर
स्पेशल स्कुल मध्ये व नंतर मुंबईतील दिलकुश स्पेशल स्कुल मध्ये प्रवेश दिला. आई -वडीलांची
साथ आणि प्रणयच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ‘प्रथम- ए आणि प्रथम- बी’ ही सामान्य विद्यार्थ्यांची ५ व ८ वी ची शैक्षणीक योग्यता मिळवीली.
स्वयंरोजगारासाठी पुढे पाऊल टाकत २००७ मध्ये मुंबईतील पंचातारांकित हॉटेल लिला
येथे प्रणय ने मुलाखत दिली आणि त्याची निवड झाली. लीननन रूम अंटेंडंट म्हणून तो
आजतागायत या हॉटेल मध्ये दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत कार्य करीत आहे.
प्रणयला थोरला व धाकटा असे दोन भाऊ असून ते नोकरीवर आहेत. प्रणय ने अंपगंत्वावर
मात करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली याचीच दखल घेऊन त्यांचा राष्ट्रीय
पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
डाऊन सिंड्रोम या आजारावर मात करून दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय
जलतरण स्पर्धेमध्ये भारतासाठी देान वेळा रजत पदक पटकाविणारी पुण्याच्या गौरी
गाडगीळ ने दिव्यांगांसाठी आदर्श निर्माण केला आहे. गौरीच्या यशाची दखल मराठी
चित्रपटसृष्टीनेही घेतली असून ‘यलो’ हा मराठी चित्रपट तिच्या यशोगाथेवर प्रदर्शीत झाला
आहे. आई स्नेहा आणि वडील शेखर गाडगीळ हे गौरी ६ वर्षाची असताना पुण्यात आले. इथे स्पेशल स्कुल मध्ये गौरीला प्रवेश मिळाला व
तिचे शिक्षण सुरु झाले. १० वीत फर्स्ट क्लास घेऊन उत्तीर्ण झालेल्या गौरी ने
एमएससीआयटी हा संगणक कोर्स पूर्ण केला व तिला पुण्यातील प्रसिध्द एसपी
महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिने समाजशास्त्र विषय घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले.
गौरीच्या आई वडिलांनी तिला २००२ मध्ये
भरतनाटयम आणि स्विमींगचे क्लास मध्ये प्रवेश दिला. गौरीने २००३ मध्येच राष्ट्रीय
स्तरावरील स्विमींग स्पर्धेत भाग घेतला. यानंतर तिने मागे वळूनच पाहिले नाही एका
पाठोपाठ शांघाय, तैवान आणि ऑस्ट्रेलिया अशा तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये
भारताचे प्रतिनिधीत्व करत २ रजत आणि २ कांस्यपदक पटकाविले. मानाच्या अशा पुणे
फेस्टीवल मध्ये गौरीने भरतनाटयम सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळविली. सध्या
गौरी भरतनाटयमच्या परिक्षा देत आहे व स्विमींग कोच चा किताब मिळवून ती स्वत:च्या
पायावर उभी राहणार आहे. गौरीचे धाडस हे
दिव्यांगासमोर आदर्श आहे तिच्या याच कामगिरीची दखल घेऊन तिला राष्ट्रीय
पुरस्काराने गौरविण्यात आले.
दिव्यांगासाठी कार्यरत सर्वोत्तम संस्थामध्ये
देशभरातून दोन संस्थाची निवड झाली. यात पहिला क्रमांक नवी मुंबई महानगर पालिकेच्या वाशी येथील ‘ई टी सी’ या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणा-या केंद्रास प्रदान करण्यात आला. नवी
मुंबई महानगर पालिका आयुक्त
डॉ. रामस्वामी एन यांनी पुरस्कार स्वीकारला. ‘ईटीसी’
केंद्राची स्थापना
२००७ मध्ये झाली. दिव्यांग मुले, व्यक्ती, त्यांचे कुटुंबिय, स्वयंसेवी संस्था
आदिंकरिता विविध कल्याणकारी योजना एकाच छत्राखाली उपलब्ध करून देणारे नवी मुंबई
महानगर पालिकेचे ही देशातील पहिले केंद्र आहे.
या केंद्राच्या विविध विभागामध्ये कर्णबधिर, मतिमंद, अध्यपन अक्षम, बहुअपंगत्व व स्वमग्न
विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण, वाचा प्रशिक्षण, श्रवण प्रशिक्षण, व्यवसायोपचार,
भौतिकोपचार व सहशालेय शिक्षण दिले जाते.
कर्णबधिरांकरिता Cochlear Implant या शस्त्रक्रियेकरिता प्रति लाभार्थी रूपये ३ लाख ५० हजारांचे
आर्थिक सहाय्य, दिव्यांगाना स्वयंरोजगाराकरिता वार्षिक आर्थिक सहाय्य रूपये ७५
हजार, प्रौढ अपंगांना मासिक आर्थिक सहाय्य आदी योजना या केंद्राच्या माध्यमातून
प्रभावीपणे राबविण्यात येतात. केंद्राच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय
पुरस्काराने गौरविण्यात आले.
दिव्यांगासाठी पुस्तक प्रकाशित
करणा-या देशातील उत्कृष्ट ब्रेल प्रेस चा एकमेव पुरस्कार मुंबई (वरळी) येथील नॅशनल
असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया (नॅब) या संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थेच्या ब्रेल प्रेसचे मानद सचिव डॉ. विमलकुमार
डेंगला यांनी पुरस्कार स्वीकारला. नॅब सर डग्गन ब्रेल प्रेस १९५८ पासून कार्यरत आहे. तंत्रज्ञान आणि संगणकीकरणाचा अंगीकार केलेली ही
देशातील अग्रणी ब्रेल प्रेस आहे. या प्रेस मधून भारतातील विविध भाषांमधून साहित्य
प्रकाशित होते आणि लाखो दृष्टीहीन विद्यार्थांना त्याचा फायदा होतो. शालेय
पुस्तकांसोबतच कविता संग्रह, कादंबरी, कथा संग्रह इत्यादी साहित्यही या प्रेस मधून
प्रकाशित होते. कुराण, ज्ञानेश्वरी,
तुकारामगाथा, श्रीमदभगवद्गीता, आदी ग्रंथ या प्रेस मधून प्रकाशित झाले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने घेण्यात येणा-या
निवडणुकांमध्ये दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल मत पत्रिकाही याठिकाणी छापल्या जातात.
संस्थेचे प्रशस्थ ब्रेल पुस्तक ग्रथांलय
असून दृष्टीबाधित लोक त्याचा उपयोग घेतात. संस्थेच्या ब्रेल प्रेसच्या महत्वपूर्ण
कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
दिव्यांगजणांकरिता सुलभ संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी दिला जाणारा ‘उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार’ जळगाव च्या ‘द जळगाव
पीपल्स को- ऑप बँक लि.’ ला प्रदान करण्यात आला .
बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी पुरस्कार
स्वीकारला. हि बँक १९३३ पासून कार्यरत
असून बँकेने दिव्यांगांना हाताळण्यास सुलभ असे संकेतस्थळ तयार केले आहे. बँकेच्या
संकेतस्थळावर दिव्यांगाकरिता मायक्रोफोन द्वारे
सुलभ भाषेमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाँटस, आशय, रंगाचा
प्रभावी वापर करून हे संकेतस्थळ दिव्यांगाना हाताळण्याची सोय करून देण्यात आली
आहे. टॉकींग मॉडयुलचा वापर करून
संकेतस्थळाच्या पुढील पेजवर जाण्याची सोय, वेब पेजची माहिती मिळावी यासाठी
प्रत्येक पेजच्या खालच्या भागास एक कोड देण्यात आला आहे. हे संकेतस्थळ सर्वच
ब्राऊजर आणि मोबाईलवर उघडण्याची सोय आहे, वेब कंटेंट एक्सेस गाईडलाईन प्रमाणे या
संकेतस्थळावर दिव्यांगासाठी एकूण ६१ गोष्टी देण्यात आल्या आहेत. बँकेचे मोबाईल
अप्लीकेश हाताळने आणि एटीएम व्यवहार करने
दिव्यांगाना सुलभ व्हावे यासाठीही बँकेचे कार्य सुरु असून भविष्यात
दिव्यांगाना या सुविधाही उपलब्ध होतील. बँकेच्या या कार्याची दखल घेऊनच राष्ट्रीय
दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अधिकृत माहिती
, वृत्त व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
http://twiteer.com/micnewdelhi
No comments:
Post a Comment