नवी दिल्ली, दि. ४ : ‘खूप
शिका, मेहनत करा जगात कुठलीच गोष्ट अशक्य
नाही असा आत्मविश्वास देताना गौरी गाडगीळ ने ‘यु कॅन डू इट’ असा यशाचा मूलमंत्रच आज महाराष्ट्र परिचय केंद्रात
दिला.
गौरी गाडगीळ आणि प्रणय बुरडे यांना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण
मंत्रालयाच्यावतीने जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले. आज
महाराष्ट्र परिचय केंद्रात या दोघांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला, यावेळी
गौरीने या भावना व्यक्त केल्या. यावेळी झालेल्या
अनौपचारीक चर्चेत या दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्याची
गौरी गाडगीळ यावेळी आपल्या घरी वावरल्यागत अगदी निर्भेड व निरविकारपणे परिचय
केंद्रात वावरत होती. मला तुमच्या
कार्यालयाचा पत्ता द्या मी तुमच्याशी संपर्कात राहील, मी अभिप्राय रजिष्टर मध्ये
अभिप्राय लिहीणार आहे....अशा विविध गोष्टींतून गौरी चा आत्मविश्वास दिसत होता. दोन्ही हात जोडून नमस्कार करून
तिने सर्वांची मन जिंकली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तिला विचारले असता ,
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद असल्याचे तिने सांगीतले. पुण्याच्या एसपी
महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेऊन गौरीने भरत
नाटयम आणि जलतरणाचेही धडे गिरविले. २००३ मध्ये
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेतला. शांघाय, तैवान आणि ऑस्ट्रेलिया अशा तीन
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत २ रजत आणि २ कांस्यपदक
पटकाविले. पश्चिम बंगाल येथील मुरशीदाबाद येथे नदीमध्ये १९ कि.मी चे अंतर बॅक
स्ट्रोक स्वीमींग करून २ तास ५५ मिनीटांमध्ये पूर्ण केले. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही तिने भरतनाटयम सादर
केले आहे. जलतरण प्रशिक्षक बनन्याचा विश्वास तिने बोलून दाखविला. अपंगत्वावर मात
करत यश संपादन करणारी गौरी म्हणते, स्वत: वर विश्वास ठेवा खूप शिका आणि पुढे जा ‘ यू कॅन डू इट’.
प्रामाणिकपणे कार्य करा जग तुम्हाला स्वीकारेल : प्रणय बुरडे
मुंबईचा
प्रणय बुरडे ही अगदी खेळकरपणे या चर्चेत
सहभागी झाला. आई, वडिलांनी मला स्वावलंबी बनविले हे तो अभिमानाने सांगत होता. विशेष
शाळेतील प्रवेश ते मुंबईतील पंचातारांकित ‘हॉटेल
लिला’ मधील नौकरी असा जीवन प्रवास प्रणय सांगत होता आणि हे
ऐकताना उपस्थितांना प्रणय बद्दल अभिमान वाटत होता. गेल्या १० वर्षांपासून हॉटेल लीला मध्ये कार्यकरत असलेला प्रणय दररोज
आठ तास प्रामाणिकपणे कोणत्याही प्रकारची रजा न घेता काम करीत असल्याचे सांगतो. अपंगत्वावर
मात करून स्वावलंबी झालेला प्रणय म्हणाला प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य केल्यास
जग तुम्हाला स्वीकारते. प्रणयचे हे सकारात्मक विचार ऐकूण उपस्थितांनी टाळयांच्या
गजरात त्याचे कौतुक केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी गौरी व त्यांची आई स्नेहा वडील शेखर
गाडगीळ यांचा तसेच प्रणय व त्यांची आई प्रसुना व वडील पुरुषोत्तम बुरडे यांचा
पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जनसंपर्क अधिकारी अमराज्योत कौर अरोरा , उपसंपादक
रितेश भुयार व कार्यालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
अधिकृत
माहिती , वृत्त व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
http://twiteer.com/micnewdelhi
००००००
सूचना – सोबत फोटो जोडले आहेत
No comments:
Post a Comment