नवी दिल्ली, 3 : देशात सर्वात जास्त पाणी वापर
स्ंस्था स्थापन करुन विक्रमी सिंचन व्यवस्था निर्माण करणा-या महाराष्ट्र शासनाच्या
जलसंपदा विभागाला केंद्र शासनाच्या केंद्रीय
सिंचन व उर्जा मंडळाच्या वतीने उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार आज प्रदान
करण्यात आला. केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते राज्याचे
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे सचिव च.आ. बिराजदार यांनी हा पुरस्कार
स्वीकारला.
केंद्र शासनाचा हा पुरस्कार प्रथमच महाराष्ट्राला
मिळाला आहे. येथील स्कोप कॉम्प्लेक्स च्या
सभागृहात केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात
केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते सिंचन व उर्जा क्षेत्रात
उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व संस्थांचा विविध
श्रेणीत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचे सचिव
यु.पी. सिंह, केंद्रीय उर्जा मंत्रालयाचे सचिव पुष्पेंद्र सिंह, केंद्रीय सिंचन व उर्जा
मंडळाचे अध्यक्ष रविंद्र वर्मा मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्राची सिंचन क्षमता दुप्पट करणार – गिरीश महाजन
केंद्र शासनाच्या केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाच्या वतीने आज मिळालेला
पुरस्कार हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे मी मानतो. यापुढे महाराष्ट्राची
सिंचन क्षमता दुप्पट करण्याचा प्रयत्न राहील अशा भावना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या. ते म्हणाले, राज्यात सुमारे 13 लक्ष
लाभक्षेत्रावर 3 हजार 242 पाणी वापर संस्था
स्थापन झाल्या आहेत. याचीच नोंद आजच्या पुरस्कारासाठी घेण्यात आली. राज्यात
225 लक्ष हेक्टर क्षेत्र लागवडी लायक असून पाटबंधारे प्रक्ल्पांतर्गत आतापर्यंत
निर्माण झालेल्या 49.50लक्ष हेक्टर क्षेत्रात सिंचन क्षमतेचा पूर्णपणे वापर करुन जास्तीत-जास्त
क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावर्षी राज्यात जवळपास 40 लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली हा राज्याच्या इतिहासातील
उच्चांक आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचे राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभत
असून राज्याची सिंचन क्षमता दुप्पट करु असा विश्वास श्री. महाजन यांनी व्यक्त केला.
महावितरणचाही सन्मान
क्षमता
वृध्दी व उत्तम प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाच्या महावितरण या
कंपनीचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महावितरणच्या मुख्य अभियंता रंजना
पगारे आणि दिल्लीस्थित निवासी संचालक प्रफुल्ल पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरण
ने आपल्या नाशिक येथील “प्रशिक्षण व सुरक्षा संस्थेच्या” माध्यमातून व प्रत्येक जिल्ह्यांच्या
ठिकाणी असणा-या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपल्या अधिकारी व कर्मचा-यांना विविध
प्रकारच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. या कार्याची नोंद घेऊन केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री
डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो
करा : http://twitter.com/micnewdelhi
00000
सूचना : सोबत फोटो जोडले आहे.
No comments:
Post a Comment