Thursday 4 January 2018

देशातील 113 कर्तृत्ववान महिलांना "फर्स्ट लेडी" पुरस्कार










महाराष्ट्रातील 15 महिलांचा होणार सन्मान

नवी दिल्ली, 4 : क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 113 कर्तृत्ववान महिलांना "फर्स्ट लेडी" हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 महिलांचा समावेश आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने "फर्स्ट लेडी" हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दि. 20 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवनात या महिलांना "फर्स्ट लेडी" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दुर्गाबाई कामत व अबन मिस्त्री याना मरणोत्तर"फर्स्ट लेडी सन्मान

महाराष्ट्रातील 15 कर्तृत्ववान महिला "फर्स्ट लेडी" पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

साताऱ्याच्या सुरेखा यादव ठरल्या "फर्स्ट लेडी"

1988 साली सर्वप्रथम रेल्वे चालविण्याचा विक्रम करण्याऱ्या सुरेखा यादव यांना फर्स्ट लेडी पुरस्कार जाहीर झाला आहे. मध्य रेल्वेची पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल ट्रेन त्यांनी चालविली आहे. प्रसिध्द बुद्धिबळपटू व पाच वेळा बुद्धिबळात भारतीय महिला चॅम्पियनशीप मिळविणाऱ्या भाग्यश्री ठिपसे, देशातील पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी हर्षींनी कण्हेकर ( नागपूर) , देशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक परभणी जिल्ह्यातील शिला डावरे यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आमदार डॉ.भारती लव्हेकर ठरल्या "फर्स्ट लेडी"

वर्सोवा, मुंबई येथील विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरु करून नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याच्या अरुणा राजे पाटील या भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ आहेत, त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील डायना एडलजी यांनी सर्वप्रथम भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले व महिला क्रिकेटला दिशा दिली, त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशातील पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या मुंबई येथील स्नेहा कामत यांचाही या पुरस्कार यादीत समावेश आहे.


पहिल्या गुप्तहेर रजनी पंडित- फर्स्ट लेडी

पालघर येथील रजनी पंडित यांनी खासगी गुप्तहेर म्हणून कार्य केले आहे, त्या देशातील पहिल्या महिला नोंदणीकृत गुप्तहेर आहेत, त्यांच्या कार्याची दखल पुरस्काराच्या रूपाने घेण्यात आली आहे. मुंबई येथील स्वाती परिमल या ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया’ (असोचेम) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाऱ्या मुंबईच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.इंदिरा हिंदुजा व अंधांसाठी देशातील पहिले ‘लाईफ स्टाइल’ मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाऱ्या मुंबई येथील उपासना मकाती आणि डिजिटल आर्ट द्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून देणारी मुंबईची अठरा वर्षीय तरुणी तारा आनंद यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला, बचेंद्रि पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधु, सानिया मिर्जा, गीता फोगट, सायना नेहवाल,साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी अनेक कर्तृत्ववान महिलांचा "फर्स्ट लेडी" पुरस्कार यादीत समावेश आहे.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा. http://twitter.com/MahaGovtMic

No comments:

Post a Comment