Saturday, 27 January 2018

शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ ठरला देशात प्रथम











नवी दिल्ली, 28: महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथ संचलनात प्रदर्शित 'छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा' चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांनी आज हा पुरस्कार स्वीकारला.
      नुकताच येथील राजपथावर  राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि आशियान देशांच्या 10 राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत भारत देशाचा 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात पार पडला. या निमित्त आयोजित पथसंचलनात देशातील विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले. 14 राज्य व केंद्रीय मंत्रालयाचे 9 चित्ररथ यावर्षी प्रदर्शित झाले, यामध्ये महाराष्ट्राच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेला 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा' या चित्ररथाची  पथसंचलनातील सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवड झाली. येथील कॅटॉन्मेट भागातील रंगशाला शिबिरात आज आयोजित शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री यांच्या हस्ते  राज्याला गौरविण्यात आले.  मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. नरेंद्र विचारे, कला दिग्दर्शक नितीन देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आसाम राज्याने यावर्षी  दुसरा तर छत्तीसगड़ राज्याने तिसरा क्रमांक पटकविला. या राज्यांनाही यावेळी गौरविन्यात  आले.
  
शिवराज्याभिषेक सोहळा ठरला देशात पुन्हा प्रथम

       महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने शिवराज्याभिषेकदर्शविणारा चित्ररथ प्रदर्शीत केला होता यास प्रथम पारितोषीक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळाया चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारीया चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.                            
यावर्षी 'शिवराज्याभिषेक सोहळा'  चित्ररथाची बांधणी जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले.  चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सोयराबाई, संभाजी राजे आदी 10 भूमिका साकारण्यात आल्या. मुंबई येथील भैरी भवानी गृपच्या कलाकारानी  या भूमिका साकारल्या.

नागपूरच्या दक्षिण-मध्य केंद्राला प्रथम पुरस्कार

राजपथावरील पथ संचलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला प्रथम पुरस्काराने आज गौरविण्यात आले. या केंद्राचे संचालक इंद्रजित ग्रोवर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या केंद्राच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचे बरेदी लोकनृत्य सादर करण्यात आले होते.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                           http://twitter.com/micnewdelhi

                                                                *****

No comments:

Post a Comment