Tuesday, 30 January 2018

पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचे निधन





नवी दिल्ली, ३० : पालघरचे  खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिल्ली येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते, त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ॲड. वनगा दिल्ली येथे आले होते. आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना तातडीने येथील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर सर्व पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

        श्री. वनगा हे उच्च विद्याविभूषित होते. वकील असलेल्या श्री. वनगा यांनी पालघरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांमध्येही त्यांनी काम केले आहे. १९९० ते १९९६ पर्यंत भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते. २००९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

                                         मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
            श्री वनगा यांचे पार्थीव आज अंत्यदर्शनासाठी येथील डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आले होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय संसदीयकार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह  आणि महाराष्ट्राचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराजे अत्राम यांनी श्री. वनगा यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. महाराष्ट्रातील खासदार सर्वश्री कपील पाटील,डॉ. सुनील गायकवाड, रक्षा खडसे, संजय धोत्रे,अजय संचेती यांनीही श्री. वनगा यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.   

                                      मान्यवरांनी व्यक्त केला शोक

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली  आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते.  विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.  

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी म्हणाले, श्री. वनगा हे नि:स्पृह, निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रात अनेक वेळा माझ्या सोबत काम पाहिले आहे. वनवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निधनाने एक सच्चा व समर्पित कार्यकर्ता आम्ही गमावला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, श्री. वनगा हे आदिवासींचे झुंझार नेते होते त्यांच्या निधनाने या समाजाचे मोठे नुकसान झाले. मी त्यांच्या सोबत काम केले आहे. श्री. वगना यांनी ठाणे आणि पालघर जिल्हयातील आदिवासींसाठी तडफेने  काम केले व आदिवासींना एक आवाज मिळवून दिला. वनवासी कल्याण आश्रम शाळा त्यांनी सुरु केल्या. तलासरी येथील आश्रमशाळेत घडलेले श्री. वनगा यांनी त्या भागातील आदिवासींच्या विकासासाठी जीवन समर्पित केले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर  म्हणाले, श्री. वनगा माझ्यासोबतच १९९६ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले, तेव्हापासून माझा त्यांचा परिचय आहे. साधे आणि मनमिळावू नेते म्हणून श्री. वनगा सर्वपरिचीत होते. त्यांनी आपल्या मतदार संघात केलेल्या कामाची पावती म्हणून ते लोकसभेत तीन वेळा निवडून आले. त्यांच्या निधनाने आदिवासींचा एक तडफदार नेता आम्ही गमावला अशा भावनाही श्री. अहीर यांनी व्यक्त केल्या.

    आम्हाला ट्विटर वर फाँलो करा http://twitter.com/mivnewdelhi
                                                 ******

No comments:

Post a Comment