Tuesday 30 January 2018

"डीबीटी" द्वारे 2 लाख 73 हजार कोटीचे वितरण : महाराष्ट्रात ३ हजार कोटी "डीबीटी" द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात


नवी दिल्ली दि ३०. थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे आजपर्यंत देशात २ लाख ७३ हजार १८३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर महाराष्ट्रात ३ हजार २१० कोटींचा निधी डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला आहे.

विविध शासकीय योजनांचा लाभ देताना होणारी गळती थांबविण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना    ( डीबीटी ) 2013 साली सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सध्या ५६ मंत्रालयांच्या ४१० योजनांचा निधी "डीबीटी" द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनेमुळे गेल्या ४ वर्षात ५७ हजार कोटींची बचत झाली आहे.

महाराष्ट्रात ३ हजार २१० कोटी "डीबीटी" द्वारे वितरित

महाराष्ट्रात थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत ३ हजार २१० कोटी १३ लाख रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्रात १८ लाख ३५ हजार ३६४ लाभार्थ्यांना डिबीटी योजनेशी जोडण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी १३ लाख ३० हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अल्पसंख्याक विभागात ४१,३१० लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे, आदिवासी विकास विभागात १ लाख ४३ हजार, उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३ लाख ८ हजार, शालेय शिक्षण विभागात १२ हजार १५६ लाभार्थ्यांची नोंदणी आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.
एका वर्षात ९० हजार कोटी डीबीटी द्वारे वितरित

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात आजपर्यंत ९० हजार २४० कोटी २८ लाख रुपयांचा निधी डीबीटी च्या माध्यमातून ६० कोटी ४५ लाख लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे २०१३ -१४ साली थेट लाभ हस्तांतरण योजनेशी केवळ १० कोटी ८१ लाख लाभार्थी जोडले गेले होते व त्यांना ७ हजार ३६७ कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता.

थेट लाभ हस्तांतरण: एक दृष्टिक्षेप

सन २०१४ ते २०१७- १८ या चार वर्षात थेट लाभ हस्तांतरण योजनेची व्याप्ती वाढली असून २०१४-१५ या वर्षात देशात ३८ हजार ९२६ कोटींचा निधी २२ कोटी ८२ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला तर २०१५ -१६ या वर्षात ३१ कोटी २५ लाख लाभार्थ्यांना ६१ हजार ९४२ कोटी डीबीटी द्वारे वितरित करण्यात आले. सन २०१६ -१७ या वर्षात ७४ हजार ७०७ कोटी रुपये ३५ कोटी ७ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले तर २०१७-१८ या वर्षात ६० कोटी ४५ लाख लाभार्थ्यांना ९० हजार २४० कोटी रुपये डीबीटी द्वारे वितरित करण्यात आले आहेत.
डीबीटी च्या माध्यमातुन प्रामुख्याने गॅस सबसिडी,रोजगार हमी योजना, छात्रवृत्ती व शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय साहाय्य योजना, सामाजिक न्याय योजनांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा

No comments:

Post a Comment