चौथ्या दिवशी 14 पदकांची कमाई
नवी दिल्ली, 3 : खेलो इंडिया अंतर्गत सुरू असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 39 पदके पटकावून महाराष्ट्र पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. आज चौथ्या दिवशी 14 पदकांची कमाई खेळाडूंनी केलेली आहे.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत ‘खेलो इंडिया’ शालेय क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. आज स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राने एकूण 14 पदके पटकाविली असून यामध्ये 7 सुवर्ण 4 रजत आणि 3 कांस्य पदके आहेत.
चौथ्या दिवसापर्यंतची महाराष्ट्राची एकूण पदकांची कमाई 39 असून महाराष्ट्र पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. यामध्ये सर्वाधिक 16 सुवर्ण, 11 रजत आणि 12 कांस्य पदके आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ 12 सुवर्ण, 13 रजत आणि 19 कांस्य पदके मिळवून दिल्ली दुस-या क्रमांकावर असून हरीयाणा 12 सुवर्ण, 10 रजत, 11 कांस्य पदके मिळवून खेलो इंडियाच्या स्पर्धेत तीस-या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्राने आज चौथ्या दिवशी खेलो इंडियाच्या विविध श्रेणीतील स्पर्धांमध्ये मिळविलेल्या पदके पुढील प्रमाणे आहेत.
मुंबईचा निल रॉय याने जलतरण स्पर्धेतील 50 मीटर फ्री स्टाईल श्रेणीमध्ये सुवर्ण पदक पटकाविले , यासह 200 मीटर व्यक्तीगत श्रेणीतील स्पर्धेतही सुवर्ण पदक निल रॉय याने मिळविले आहे. केनिशी गुप्ता हिने जलतरणमध्येच 50 मीटर फ्री स्टाईल आणि 200 मीटर व्यक्तीगत श्रेणीमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. 52 किलोच्या फ्री स्टाईल कुस्ती या क्रिडा श्रेणीत पुण्याची भाग्यश्री फंद हिला सुवर्ण पदक मिळाले. मुलांच्या गटातील 4x100 च्या रीले स्पर्धेत ठाण्याचा पुष्कर सुभाष पाटील, पुण्याचा सुरज अंकोला, अक्षय गोवर्धन आणि पालघर जिल्ह्यातील किरण हेगीस्टे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. पोल वॉल्ट (बांबूच्या साहाय्याने उंच उडी मारणे) या क्रिडा प्रकारात राकेश गौंड याला सुवर्ण पदक मिळाले.
400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशाळेतील ताई बाम्हणे हिने रजत पदक पटकाविले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय, कसबे तडवळ येथील पार्थ खंडारे याने 54 किलोच्या ग्रेको रोमन कुस्तीच्या प्रकारात रजत पदक पटकाविले. रोहन भोसले याने 46 किलोच्या ग्रेको रोमन कुस्तीच्या प्रकारात रजत पदक मिळविले. मुलींच्या गटातील 4x100 मीटर रीले शर्यतीत पुण्यातील अंवतीका नराळे आणि आभा शैलेश सांळुखे, ठाण्यातील चार्वी पुजारी आणि औरंगाबाद येथील प्रतिक्षा ज्ञानदेव सानस यांनी रजत पदक पटकाविले.
46 किलो गटातील फ्रि स्टाईल कुस्तीत अहमदनगरची सोनाली मंडलीकने कांस्य पदक पटकाविले. मुलींच्या गटातील 4x100 च्या रीले स्पर्धेत नागपूरची हिमानी फडके, ठाण्यातील अन्यया जोशी, पुण्यातील शरोन शाजु आणि निष्ठा अग्रवाल यांनी कांस्य पदक पटकविले. मुलांच्या गटातील 4 x400 च्या रिले प्रकारात पुण्याचा लक्ष्मण धारवाड, कोल्हापुरातील निरंजन शेटके व विकास खोडके आणि आर्यन लांडगे यांना कांस्य पदक मिळाले.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेचे उदघाटन 31 जानेवारीला झाले. या स्पर्धा देशभरातील १७ वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांनी १६ क्रीडा प्रकारात यात सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा 8 फेब्रुवारीपर्यंत चालेल.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
००००००
No comments:
Post a Comment