नवी
दिल्ली, 15 : पुणे
येथील डॉ. मीनु मेहता कुष्ठरोग संस्थेच्या संचालक मंडळाच्या पदाधिका-यांनी आज महाराष्ट्र
परिचय केंद्रास भेट दिली.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद
कांबळे यांनी डॉ. मीनु मेहता कुष्ठरोग संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,विधी
सल्लागार ॲड. त्र्यंबक खोपडे, सचिव राजु चौधरी आणि लिज्जत पापड उद्योग समुहाचे
मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या संचालक
मंडळाने आज राष्ट्रपतीभवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली या भेटी
विषयी तसेच संस्थेच्या वैविद्यपूर्ण कार्याविषयी त्यांनी यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान माहिती
दिली.
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी
सांगितले, आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. १९८७ साली पुणे
येथील कोंढवा भागात स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ६ हजार
कुष्ठरोग्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे झालेले कार्य कौतुकास्पद असल्याचे
राष्ट्रपती यांनी सांगितले. कुष्ठरोग्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करून
त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचे कार्य
ही संस्था करीत असल्याची माहिती या संचालक मंडळाने दिली. तसेच,संस्थेच्या मागण्यांबाबतही
त्यांनी यावेळी राष्ट्रपतींशी चर्चा केली.
संस्थेच्या मागण्यांमध्ये कुष्ठरोग्यांसाठी कार्यरत देशातील संस्थाना
जीएसटी कर माफ करण्यात यावा, वरोरा येथील आनंदवन महारोगी पुनर्वसन संस्थेच्या
धर्तीवर डॉ. मीनु मेहता कुष्ठरोग संस्थेच्या विविध विभागातील कर्मचा-यांना
राज्यशासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानधन प्राप्त व्हावे आणि संस्थेतील
कुष्ठरोग्यांना गेल्या तीन वर्षांमध्ये देण्यात आलेल्या पगारा एवढीच रक्कम
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने उपलब्ध करून द्यावा या
संदर्भात सविस्तर चर्चा झाली. या मागण्यांचे निवदेनही संचालक मंडळाने राष्ट्रपती
यांनी सादर केले, याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालय व सामाजिक न्याय व सक्षमीकरण
मंत्रालयाकडे हा विषय मांडण्याच्या सूचना राष्ट्रपती यांनी केल्याचे प्रकाश पाटील
यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment