नवी दिल्ली, १४ : श्रेष्ठ कलाकृती ही सृजनशिलतेतून निर्माण होते, त्यासाठी चितंनशिलता हा कलावंताच्या कृतीचा पाया असावा असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मांडले.
श्री देशमुख यांना मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापार्श्वभूमीवर, महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांचा सत्कार व अनौपचारिक वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. देशमुख यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. श्री. देशमुख यांच्या पत्नी शालिनी देशमुख यांचेही पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी झालेल्या अनौपचारिक वार्तालाप प्रसंगी श्री.देशमुख म्हणाले, महाराष्ट्राला संतसाहित्य, लोकवाड्:याची दिर्घ परंपरा असून त्याचे प्रतिबिंब साहित्यातून दिसून येते. संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा तर चक्रधरस्वामींनी लिहीलेला‘लिळाचरित्र’ हे आदर्श पद्य व गद्य ग्रंथ असून संत तुकारामांनी लिहीलेल्या रचना या विद्रोही साहित्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी या सर्व साहित्याचा मूळ धागा असून शेतीच्याच संज्ञा वापरण्यात आल्या आहेत. जगातील सृजनशिलतेच्या मुळाशी कष्टक-यांचा आवाज असल्याचे सांगून चिंतनशिलता हा कलावंताच्या कृतीचा पाया असावा अशा असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
श्री. देशमुख महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात उपनिबंधक पदावर कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी प्रशासकीय सेवा आणि साहित्य याचा ताळमेळ, त्यांच्या साहित्य कृतींचा प्रवास आदींबाबतही माहिती दिली. यावेळी श्री. देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त काव्य संग्रहातील काही कवितांचे वाचनही केले. परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment