Monday, 12 February 2018

श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान



नवी दिल्ली, दि. 12 : प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही... या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष 2017 साठी मराठी  साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.
कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांचा शानदार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.  पुरस्कार वितरण सोहळयाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लेखक किरण नागरकर होते. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर खंबार, उपाध्यक्ष माधव कौशिक आणि सचिव डॉ. के. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते.  यावेळी देशभरातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख  यांच्या  बोलावे ते आम्ही.. या काव्य संग्रहास मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे आहे.
  बोलावे ते आम्ही..हा श्रीकांत देशमुखांचा जुन्या  पिढीतील नवा कवितासंग्रह आहे. गावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. 
या संग्रहात पाच विभाग आहेत. 68 कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे. प्रस्तुत संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधले आहे. जन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने सांगीतले आहे. जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्कर, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडय़ा, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात.
माती, रेत यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते. उजळमाथ्यानं भूमिपुत्रया भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं. उंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळय़ांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे ही या काव्यसंग्रहात सूचकपणे आविष्कृत केले आहे.

               श्रीकांत देशमुख हे मराठी साहित्यविश्वाला कवी म्हणून परिचित आहेत. बळीवंत’, पडझड आषाढमाती, बोलावे ते आम्ही हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ, कुडाळवाडी भूषण शिवराय हे वैचारिक ग्रंथलेखन तसेच काही ग्रंथांची संपादनेही त्यांनी केली आहेत. पडझड वा-याच्या भिंती हा त्यांचा ललितगद्याचा संग्रहही प्रसिध्द आहे.
                                       

०००००

No comments:

Post a Comment