Tuesday 27 February 2018

युवा संशोधक जव्वाद पटेल यांस आयईआरपी पुरस्कार


नवी दिल्ली, २७ : अकोला येथील युवा संशोधक जव्वाद पटेल यांना औषध व अरोग्य क्षेत्रातील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अनुकरणीय संशोधन सादरीकरण (आयईआरपी) संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.  
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) व आयईआरपीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पीएचडी चेंबर मध्ये आयईआरपीच्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात औषध व आरोग्य क्षेत्रातील संशोधनासाठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी एम्सचे वैद्यक व प्राध्यापक डॉ. राजेश मलहोत्रा यांच्या हस्ते युवा संशोधक जव्वाद पटेल यांना  वैद्यक क्षेत्रातील तीन संशोधनांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयईआरपीचे प्रमुख डॉ. देवानंद गुप्ता यावेळी उपस्थित होते. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेले तीन संशोधन

जव्वाद यांना सामाजोपयोगी संशोधनात विशेष आवड आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डयुड्रॉप यंत्र तयार केले आहे. हवेच्या आर्द्रतेपासून पाणी तयार करणारे हे यंत्र अल्कलायीनचे पाणी तयार करते त्यामुळे कर्करोगाच्या पेशी नियंत्रित होतात. गेल्यावर्षीच जव्वादने डयुड्रॉप यंत्र तयार केले असून या यंत्रास पेटंटही मिळाले आहे.

  जव्वाद यांनी स्तनांचा कर्करोग चाचणी घेणारे इपीडर्मस  यंत्र  तयार केले आहे. मायक्रो पालपेशन या विज्ञानाच्या सूत्रावर आधारीत इपीडर्मस यंत्राद्वारे डॉक्टरांच्या मदतीशिवाय स्वत: व्यक्तीच स्तनांच्या कर्करोगाची चाचणी करू शकते. जव्वाद यांनी तयार केलेल्या रक्त नमुना न घेता मधुमेह चाचणी करणारे नॉन इनव्हेसीव शुगर डिटेक्शन डिवाईसची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

जव्वाद पटेल हे मुळचे अकोला येथील असून ते सद्य: हेद्राबाद येथील एलआयटी संस्थेतून बी.टेक चे शिक्षण घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत २ हजारांहून अधिक संशोधन केली आहेत, त्यातील २ संशोधनाला पेटंटही मिळाले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी ३९ रिसर्च पेपर्सचे सादरीकरण केले आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                     00000


No comments:

Post a Comment