नवी
दिल्ली, २३ : महात्मा गांधी आणि गडचिरोली हेच माझे खरे विद्यापीठ आहे,
ज्याद्वारे मी मानवतेचे शिक्षण घेऊन समाजकार्य करू शकलो असे उदगार पद्मश्री व
महाराष्ट्र भूषण डॉ.अभय बंग यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात काढले .
महाराष्ट्र परिचय केंद्रात आज डॉ. अभय बंग यांचा
सत्कार व संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी, ते बोलत होते. परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. बंग यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ
देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. बंग यांच्याशी झालेल्या अनौपचारीक गप्पांमध्ये त्यांनी
केलेल्या आरोग्य क्षेत्रातील वैविद्यपूर्ण कार्याला उजाळा मिळाला.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन पत्नी
डॉ.राणी बंग यांच्या साथीने गडचिरोली या नक्षलप्रभावीत व आदिवासी बहुल
जिल्ह्यामधील ग्रामीण भागात 1986 मध्ये आरोग्य सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली.
या भागातील नवजात बालकांचे मृत्यु थांबविणे यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले. मूळ
प्रश्नाचा गाभा शोधण्यासाठी विविध संशोधन केली. ‘सर्च’ संस्थेची स्थापना करुन बालमृत्यू थांबविण्यासाठी
आम्ही कामाला लागलो.
न्युमोनिया हे नवजात बालकांच्या
मृत्यूचे कारण असल्याचे आमच्या लक्षात आले. त्या दिशेने आम्ही संशोधन करुन
बालमृत्यू रोखण्याची साधी पध्दत शोधून काढली. प्रत्येक गावात ‘सर्च’ चे
आरोग्य दूत निर्माण करुन बालमृत्यू चा दर कमी करण्याबाबत कार्य सुरु केले. ‘सर्च’ च्या
माध्यमातून सुरक्षित बाळंतपण, नवजात बाळाची काळजी, प्रभावी आरोग्य सेवा पुरविण्याचे
कार्य सुरु आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत ‘आशा’ कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करुन नवजात
बालमृत्यू रोखण्यासाठी ‘सर्च’ महत्वाची
भूमिका पार पाडत आहे. ‘सर्च’ च्या
माध्यमातून 500 प्रशिक्षक निर्माण करण्यात आले व त्यांनी 8 लाख ‘आशा’ कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांनी यावेळी दारुबंदी, लैगिंक शिक्षण या क्षेत्रात केलेल्या कार्याची ही माहिती
दिली.
या सर्व प्रवासात महात्मा गांधीजीचे विचार आणि गडचिरोलीच्या
जनतेची साथ अंत्यत मोलाची ठरली म्हणूनच महात्मा गांधी व गडचिरोली हे आपले विद्यापीठ
असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राणी बंग
ख-या अर्थाने अर्धांगिनी
पत्नी डॉ. राणी बंग यांच्या
साथीने गडचिरोलीतील कार्याला सुरुवात झाली. त्यांच्या सक्षम साथीमुळेच हे आभाळभर
कार्य करु शकलो त्या ख-या अर्थाने माझ्या अर्धांगिनी आहेत अशा भावना डॉ.अभय बंग
यांनी व्यक्त केल्या. डॉ. राणी बंग यांनी ‘सर्च’ ला
नवा आयाम दिला. स्वत: गावांगावांमध्ये जाऊन आरोग्य विषयक जागृती करणे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे, ‘तारुण्यभान’
या कार्यक्रमाच्या माध्यमातून लैगिंक शिक्षणाविषयी जनजागृती करण्याचे
मोलाचे काम त्यांनी केले. केंद्र शासनाने मला व पत्नी डॉ. राणी बंग यांना पद्मश्री
पुरस्कार देऊन आम्हा दोघांच्या समसमान कार्याचे खरे कौतुक केले असेही ते म्हणाले.
पद्मश्री
पुरस्कार : 300 कार्यकर्ते व गडचिरोलीचा
सन्मान
केंद्र शासनाने दिलेला पद्मश्री या मानाच्या नागरी पुरस्काराचा आम्ही
सन्माने स्वीकार केला असून हा ‘सर्च’
च्या 300
कार्यकर्त्यांचा व गडचिरोलीचा सन्मान
आम्ही मानतो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. गडचिरोली जिल्ह्यात आमच्या
कामामध्ये येणा-या अडचणी व मर्यादा यामुळे आम्हाला सतत प्रेरणा मिळत गेली व काम
करण्याचा उत्साह आला. म्हणून आमच्यासोबत
अहोरात्र व समर्पण वृत्तीने कार्य करणारे
सर्च चे कार्यकर्ते व गडचिरोलीवासी यांचाच हा पुरस्कार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश
भुयार यांनी केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा व माहिती अधिकारी
अंजू निमसरकर-कांबळे तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, दिल्लीतील विविध क्षेत्रात
कार्यरत असणारे मान्यवर, परिचय केंद्राच्या ग्रंथालयाचे सभासद, परिचय केंद्राचे
कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment