Friday, 9 March 2018

‘श्री राजा शिवछत्रपती’ महानाट्य दिल्लीकर व देशवासियांसाठी प्ररेणादायी ठरेल -डॉ. महेश शर्मा




नवी दिल्ली, ८ : कुशल प्रशासक व प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण जगासाठीमार्गदर्शक आहे. ऐतिहासिक लाल किल्यावर सादर होणारे  हिंदीतील श्री. राजा शिवछत्रपती महानाट्य दिल्लीकरांसह संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी आज व्यक्त केला.

            येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात  डॉ. शर्मा यांच्या हस्ते श्री. राजा शिवछत्रपती- एक ऐतिहासिक गौरव गाथा या महानाट्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, भारतीय सांस्कृतिक संबध परिषदेचे अध्यक्ष तथा  खासदार विनय सहस्त्रबुध्दे , राजा शिवछत्रपती महानाट्य आयोजन समितीचे शाम जाजु  यावेळी मंचावर उपस्थित होते.

            डॉ. शर्मा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी परकियांची सत्ता धुडाकावून लावत स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी स्वत:चे सक्षम सैन्य निर्माण केले. स्वतंत्र आरमार उभारले. शिवाजी महाराजांचा गनिमीकावा जगप्रसिध्द असून शक्ती सोबत युक्तीचा प्रभावी वापर  त्यांनी या माध्यमातून केला . आई राजमाता जिजाऊ व वडिल शहाजी राजे यांनी छत्रपतींना मोलाची शिकवण दिली. पुढे एक कुशल प्रशासक व प्रजाहितदक्ष राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाला परिचीत झाले. छत्रपतींच्या कार्याचा गौरव म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा हे मराठी भाषेतील महानाट्य होय. या महानाट्याचे हिंदी रुपांतरीत श्री. राजा शिवछत्रपती- एक ऐतिहासिक गौरव गाथा च्या माध्यमातून दिल्लीकरांसह संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व पोहचेल असा विश्वास व्यक्त करत डॉ. शर्मा यांनी महानाट्य आयोजन समितीला शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. शर्मा यांच्या हस्ते बुक माय शो या संकेतस्थळावरील महानाट्याच्या नि:शुल्क प्रवेशिकेचे उद्घाटन करण्यात आले.  

            शाम जाजु यांनी प्रास्ताविक भाषणात महानाट्य आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे  गौरवशाली कार्य व महानाट्याच्या माध्यमातून दिल्लीतील त्याचे सादरीकरण याबाबत माहिती दिली.  विनय सहस्त्रबुध्दे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे  महान कार्य व त्याची प्रासंगिकता उलगडून सांगितली.

लाल किल्यावर श्री. राजा शिवछत्रपती- एक ऐतिहासिक गौरव गाथा महानाट्य

राजा शिवछत्रपती महानाट्य आयोजन समितीच्या वतीने येथील लाल किल्यासमोरील प्रांगणात दि. 6 ते 10 एप्रिल 2018  दरम्यान श्री. राजा शिवछत्रपती- एक ऐतिहासिक गौरव गाथा महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेर निर्मित या महानाट्यासाठी चार मजली  फिरता रंगमंच उभारण्यात येणार असून 250 हून अधिक कलाकार यात सहभागी होणार आहेत. हत्ती, घोडे, ऊंट यावरुन निघणारी महानाट्यातील मिरवणूक व फटाक्यांची आतशबाजी खास आकर्षण असणार आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic               

                                           0000  

No comments:

Post a Comment