नवी दिल्ली दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधीमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील पुतळयास अभिवादन केले. यावेळी प्रधान सचिव तथा गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस व पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
‘महामानवाला अभिवादन’ लोकराज्य विशेषांक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद
खासदार डी. राजा व आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रदर्शनाला भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने संसद मार्ग येथे आज महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ प्रदर्शन लावून विशेषांक वितरित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावरील ‘महामानवाला अभिवादन’ हा लोकराज्य विशेषांक व महाराष्ट्र अहेडचा ‘ट्रीब्युट टू द लेजेंड’ हे विशेषांक’ या प्रदर्शनात मांडण्यात आले.
या प्रदर्शनास खासदार डी. राजा व आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावरील विशेषांकातील आशय, मांडणी उत्तम व उपयुक्त असल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.
संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी येणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या प्रदर्शनाला भेट दिली .
राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांनी संसद भवनात डॉ. आंबेडकरांना वाहिली आदरांजली
संसद भवन परिसरात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह,केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत , खासदार डॉ. नरेंद्र जाधव, आमदार जोगेंद्र कवाडे आदी यावेळी उपस्थित मान्यवरांनीही महामानवला अभिवादन केले.
No comments:
Post a Comment