Wednesday, 4 April 2018

राज्यातील महाजनकोच्या औष्णिक वीज प्रकल्पांना पुरेसा कोळसा उपलब्ध होणार : ऊर्जा मंत्री बावनकुळे





नवी दिल्ली, दि. 4 : राज्यातील महाजनकोच्या औष्णिक वीज प्रकल्पांना पुरेसा कोळसा केंद्राकडून उपलब्ध होणार, असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

            येथील रेल भवनमध्ये श्री बावनकुळे यांनी आज केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पांना  पुरेसा कोळसा मिळण्याबाबतची मागणी केली. यावेळी खासदार कृपाल तुमाने, महाजनको चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक (खाण) श्याम वर्धने  तसेच केंद्र शासनाच्या रेल्वे आणि कोळसा या विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महाजनको) अंतर्गत येणा-या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भूसावळ, परळी, नाशिक या औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये सध्या अत्यल्प कोळसा उपलब्ध आहे. वाढता उन्हाळा बघता अधिक वीज लागणार आहे. वीजेची कपात होऊ नये यासाठी या  सात औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना पुरेसा कोळसा वेळेच्या आत उपलब्ध होण्याबाबतची मागणी आजच्या बैठकीत श्री बावनकुळे यांनी केली.  या सात औष्णिक वीज प्रकल्पांमधून 10170 मेगा वॅट वीज निर्मिती केली जाते. या औष्णिक प्रकल्पांना लवकरात लवकर कोळसा उपलब्ध केला जावा, असे निर्देश श्री गोयल यांनी केंद्रीय कोळसा विभागाच्या अधिका-यांना यावेळी केले.

            महाराष्ट्राला मिळणारा कोळसा हा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, महानदी कोलफील्ड्स लिमिटेड, साऊथ ईस्ट कोलफील्ड्स लिमिटेड, सिंगरेनी कोलरीस कंपनी लिमिटेड, या कोळसा मंत्रालयाच्याअंतर्गत येणा-या  कंपन्यांकडून करारप्रमाणे महाजनकोच्या औष्णिक वीज प्रकल्पांना कोळसा पुरविला जातो. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे कोळसा उपलब्ध होत नव्हता त्यासंदर्भातही आज सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यात आला. महाजनकोशी झालेल्या कराराप्रमाणेच कोळसा राज्याला दिला जाईल, असे आश्वासन श्री गोयल यांनी दिले. यासोबतच आज झालेल्या बैठकीत या कंपन्यांकडून मिळणारा कोळसा हा रेल्वेमार्गासह महामर्गानेही  राज्य शासन उचलणार असल्याचे निश्चित झाले.
           

No comments:

Post a Comment