Saturday, 7 April 2018

पद्मश्री प्रा. गंगाधर पानतावणे यांनी दलित साहित्याला वैचारिक प्रतिष्ठा दिली : डॉ. नरेंद्र जाधव






नवी दिल्ली दि. 7 : महाराष्ट्राला  संताच्या परपंरेसोबत वैचारिक परपंराही लाभली आहे.  त्यामुळेच मराठी साहित्याचे एक वेगळे महत्व आहे. याला अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत करण्याचे कार्य दलित साहित्यिकांनी आपल्या स्वनुभवातून केलेले आहे. या साहित्याला वैचारिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य पद्मश्री प्रा. गंगाधर पानतावणे यांनी केले, असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज केले.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदन येथे दिवंगत पद्मश्री प्रा. गंगाधर पानतावणे यांच्या श्रध्दाजंलीचा कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री. जाधव बोलत होते. खासदार विनय सहस्त्रबुद्धे  याप्रसंगी उपस्थित होते.

प्रा. पानतावणे यांनी अस्मीतादर्श मासिकाच्या माध्यमातुन दलित साहित्याला दिशा देण्याचे काम केले. असे सांगुन श्री जाधव म्हणाले, अस्मीतादर्शहे मासिक सातत्याने 50 वर्ष प्रा. पानतावणे यांनी चालविले. या मासिकाने अनेक तरूण लेखक, कवींना नवे दालन दिले. बाबासाहेबांच्या विचारांचे संवर्धक म्हणून प्रा. पानतावणे यांनी शेवटपर्यंत आपले आयुष्य समर्पित केले. प्रा. पानतावणे यांनी आपल्या हयातीत 20 वैचारिक ग्रंथ तसेच 12 पुस्तकांचे संपादन केले, असल्याची माहितीही श्री जाधव यांनी यावेळी दिली. प्रा. पानतावने यांच्याशी असलेला स्नेह तसेच त्यांच्या सोबत झालेल्या भेटींच्या आठवणींना श्री जाधव यांनी यावेळी उजाळा दिला.

बाबासाहेबांची पत्रकारिता हा विषय पीएचडीसाठी प्रा. पानतावणे यांनी निवडला असून त्यांच्या प्रबंधात बाबासाहेबांनी  प्रकाशित केलेले मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्धभारत या चार वर्तमान पत्रांची  विश्लेषणात्मक मांडणी त्यांनी केली. समकालीन परिस्थितीवर त्याचे पडलेले परिणाम यांची मिमांसा प्रा. पानतावणे यांच्या या प्रबंधात दिसून येते,असे श्री जाधव यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा चा संदेश प्रा. पानतावणे यांनी दलित साहित्याला दिलेल्या योगदानाच्या माध्यमातून जीवंत ठेवला, असल्याचे श्री जाधव म्हणाले.



श्री विनय सहस्त्रबुद्धे यांनी पद्मश्री प्रा. गंगाधर पानतावणे यांचा जीवनप्रवास सांगितला. श्री पानतावणे यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. मौन राहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

No comments:

Post a Comment