नवी
दिल्ली, १५ : ‘डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त विशेष उपक्रमाची’ आणि ‘स्वच्छ भारत
अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्रातील ६ ‘कॉमन सर्विस सेंटर्स’ना(सीएससी) आज राष्ट्रीय
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय इलेक्ट्रॉनीक व माहिती-तंत्रज्ञान
मंत्रालयाच्या कॉमन सर्विसेस सेंटर्स स्कीम या विभागाच्यावतीने येथील इंडिया
हॅबीटॅट सेंटरच्या स्टेन सभागृहात देशभरातील निवड झालेल्या कॉमन सर्विस सेंटर्ससाठी
दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १४ मे २०१८ रोजी केंद्रीय
इलेक्ट्रॉनीक व माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते या
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
देशभरातून ७०० प्रतिनिधींनी या प्रशिक्षण
कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त विशेष उपक्रमाची’ आणि ‘स्वच्छ भारत
अभियानाची’ प्रभावी
अंमलबजावणी करणा-या देशभरातील १०० कॉमन सर्विस सेंटर्सचा या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या
आज अंतिम सत्रात कॉमन सर्विसे सेंटर्स स्कीम विभागाचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.
दिनेश त्यागी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
स्वच्छता पंधरवाडयात अकोला येथील ‘सीएससी’ प्रथम
केंद्र शासनाच्यावतीने दिनांक १ ते १५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ स्वच्छता पंधरवाडयाचे देशभर आयोजन करण्यात आले. याकाळात देशभरातील कॉमन सर्विस सेंटर्सच्यावतीने स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात आला. महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी अकोला येथील उमरी भागातील ‘दिलासा- कॉमन सर्विस सेंटर’ राज्यातून प्रथम ठरले. कार्यक्रमात या केंद्राचा सत्कार करण्यात आला. सेंटरच्या संचालिका प्रतिभा काटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लॅपटॉप, प्रोजेक्टर आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गोंदिया येथील कॉमन सर्विस सेंटरला द्वितीय पुरस्कार मिळाला सेंटरचे प्रमुख राजकुमार असाटी यांनी पुरस्कार स्वीकारला. आरोग्य निदान किट आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यातील म्हसुरने गावातील कॉमन सर्विस सेंटरला तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सेंटरच्या प्रमुख माधुरी पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. स्मार्टफोन आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील सीएससी ठरले प्रथम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त राज्यात आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून १० दिवसांच्या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी व राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील कॉमन सर्विस सेंटरला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेंटरचे प्रमुख विश्वास वाघ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लॅपटॉप आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या श्रेणीत दुसरा क्रमांक नागपूर येथील हिंगना भागातील कॉमन सर्विस सेंटरने पटकावला. सेंटरच्या प्रमुख संजीवनी निवाणे यांनी पुरस्कार स्वीकारला .टॅबलेट व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गोंदिया येथील कॉमन सर्विस सेंटरला तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेंटरचे प्रमुख राजकुमार असाटी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्मार्टफोन व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कॉमन सर्विस सेंटर्सच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध सेवा
देशात २००८ पासून कॉमन सर्विसेस सेंटर्स उभारण्यात आली व यामाध्यमातून देशातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाच्या योजना व कार्यक्रमांविषयी माहिती, विविध ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सोयी पुरविण्याचे कार्य सुरु आहे. राज्यात अशा सेंटर्सची संख्या वाढली आहे.
या सेंटर्सच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता कार्यक्रम, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना(शहरी व ग्रामीण), प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांविषयी माहिती जनतेपर्यंत पोचविण्यात येते तसेच यासंदर्भात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. यासोबतच शेतकरी कर्ज माफी योजनेची माहिती व अर्ज भरणे, पासपोर्ट सुविधा, रेल्वे व बसचे आरक्षण, आधारकार्ड , डिजीटल पेमेंट सुविधा आदी सेवा पुरविण्यात येतात.
००००
No comments:
Post a Comment