Tuesday, 8 May 2018

लोको पायलट ब्रह्मे यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला



                              रेल्वे मंत्रालयाकडून कौतुक

नवी दिल्ली, 8 : कामाप्रती समर्पण आणि समय सुचकता दाखवत हावडा – छत्रपती शिवाजी टर्मीनस (मुंबई)’ या रेल्वे गाडीचाअपघात वाचविणारे नागपूर येथील लोको पायलट डी.एल. ब्रह्मे व दिवंगत सहायक लोको पायलट एस.के.विश्वकर्मा यांच्या कार्याचे रेल्वे मंत्रालयाने कौतुक केले आहे.

            रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, दिनांक ६ मे रोजी दुपारी ४.५६ वाजता. रेल्वे क्रमांक १२८१०, हावडा–छत्रपती शिवाजी टर्मीनस (मुंबई)’ ही मुंबईकडे जात असताना तळणी ते धामनगाव दरम्यान रेल्वेतून अचानक धूर निघताना दिसले. यावेळी, रेल्वेचे लोको पायलट डी.एल.ब्रह्मे यांनी समय सूचकता व धाडस दाखवून  गाडी थांबवली. तात्काळ अग्नीशमन साधणांचा वापर करत त्यांनी गाडीतील आग विझविली. श्री. ब्रह्मे यांच्या साहसी कार्यामुळे मोठा अनर्थ व प्राणहानी टळली व इंजीन बदलवून रेल्वे पुढच्या प्रवासासाठी मुंबईकडे रवाना झाली. यादरम्यान सहायक लोको पायलट एस.के. विश्वकर्मा हे संपूर्ण स्थितीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी चोखपणे बजावत असताना रेल्वेतून खाली पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला.   या प्रकरणासंदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे) यांना उच्च समितीकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

            श्री विश्वकर्मा यांनी आपल्या जीव गमावून रेल्वेचा मोठा अनर्थ रोखला व प्रवाशांचे प्राण वाचविले. नागपूर येथील सहायक लोको पायलट श्री. विश्वकर्मा यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी नागपूर व मध्यरेल्वेच्या अन्य रेल्वे स्थानकावर शोकसभा आयोजित करण्यात आली.

              श्री. डी.एल.ब्रह्मे आणि श्री. विश्वकर्मा यांनी दाखविलेल्या अदम्य साहसामुळे भारतदेशाची जीवन वाहिनी  म्हणून ओळख असणा-या भारतीय रेल्वेची मान उंचविली असून रेल्वे मंत्रालय त्यांच्या कार्याला प्रणाम करते असे रेल्वे प्रशासनाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.                              
                                                  000000

     आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment