Monday, 7 May 2018

महिलांच्या मदतीसाठी वर्धा येथे ‘वन स्टॉप सेंटर’


  
नवी दिल्ली, 7 : अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत पोचविण्यासाठी देशभर नव्याने १०० वन स्टॉप सेंटर उभारण्यास आज महिला व बाल कल्याण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मंत्रालयाने महाराष्ट्रात वर्धा येथे असे सेंटर उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
          केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या कार्यक्रम मंजुरी मंडळाने (पीएबी)  देशातील ९ राज्यांमध्ये नव्याने १०० वन स्टॉप सेंटर उभारण्यास आज मंजुरी दिली. महाराष्ट्रासह हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, मिझोरम, नागालँड, ओडिशा, तामिलनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ही सेंटर उभारण्यात येणार आहेत. आजच्या बैठकीत महाराष्ट्रात वर्धा येथे वन स्टॉप सेंटर उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
                                        असे कार्य करते वन स्टॉप सेंटर
            महिलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी महिलांना एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर उभारण्यात येतात. या सेंटरमध्ये पोलीस सहाय्य, आरोग्य सहाय्य, मानसिक समुपदेशन, कायदेविषयक समुपदेशन आदी सुविधा पुरविल्या जातात. तसेच पिडीत महिलेला ५ दिवस वास्तव्याची सुविधाही या सेंटरद्वारे पुरविण्यात येते.  
            केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने एप्रिल २०१५ पासून देशात वन स्टॉप सेंटर योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत १८२  सेंटर्स उभारण्यात आली असून ३३ राज्य व केंद्र शासीत प्रदेशातील १ लाख ३० हजार महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
000000
     आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment