Wednesday, 2 May 2018

५ व ६ मे रोजी राजधानीत ‘महाराष्ट्र महोत्सवाचे’ आयोजन : डॉ. ज्ञानेश्वर मुळे



नवी दिल्ली दि. 2 : महाराष्ट्र दिनानिमित्त पुढचे पाऊल आणि महाराष्ट्र शासनयांच्या संयुक्त विद्यमाने  महाराष्ट्र महोत्सवा चे आयोजन ५ व ६ मे २०१८ रोजी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात होणार आहे. अशी माहिती  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तथा पुढचे पाऊल संस्थेचे संस्थापक व निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली.
           
दोन दिवसीय आयोजनामध्ये 5 मे रोजी महाराष्ट्रातील उद्योजकता, उद्योगांसाठी विविध संधी, महिला उद्योजकांच्या यशोगाथा, या व अशा अनेक विषयांवर परिसंवादाचे आयोजन या निमित्त  करण्यात आलेले आहे. यास‍ह नाटक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी या दरम्यान असणार आहे. ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यासह याच दिवशी मराठी नाटक बाप व्हाया फेसबुकयाचे सादरीकरणही आहे.
6 मे रोजी महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रमधला संवाद दृढ व्हावा यावर चर्चासत्र होणार आहे.  यासह आजची मराठी कविता- दशा आणि दिशा याविषयावरील परिसंवाद होणार आहे. महराष्ट्रातील क्लसटरचा विकास आणि राज्यातील क्रीडा क्षेत्र याविषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 मुळ मराठी भाषिक मात्र, महाराष्ट्राबाहेर राहुन विविध क्षेत्रात नावलौकीक करणा-या व्यक्तींचा सत्कार या महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ मुर्तिकार पद्मभुषण पुरस्कार प्राप्त राम सुतार आणि ज्येष्ठ साहित्यिका पद्मश्री पुरस्कार प्राप्त मालती जोशी यांचा सत्कार  होणार, असल्याची माहिती डॉ. मुळे यांनी यावेळी दिली.

                                         मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
     दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्यसभेचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. यासह विविध केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या कार्यक्रमामध्ये  सहभाग असणार अशी महिती डॉ. मुळे यांनी दिली. या महोत्सवा दरम्यान संस्थेच्या संकेतस्थळाचे व स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.      

दिल्लीत कार्यरत विविध मराठी संस्था व मराठी  माणसांना एकत्र आणणे, महाराष्ट्रातील तरूणांना भविष्यासाठी  दिल्लीतील विविध क्षेत्रातील संधी व करीअरसाठी प्रेरीत करणे, राजधानीत महाराष्ट्रीय जनतेला एकत्रीत आणून महाराष्ट्राची मुद्रा उमटविणे हा या महाराष्ट्र महोत्सवाचा उद्देश असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगीतले.                 
                  
          दिल्ली येथे  विविध केंद्रीय मंत्रालये व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत महाराष्ट्रातील अधिका-यांच्या पुढाकाराने पुढचे पाऊलया संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविण्यात येतात. सदर संस्था प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करीत असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगीतले.     


No comments:

Post a Comment