नवी दिल्ली ,3 : देशात
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमांतर्गत नव्याने
समावेश करण्यात आलेल्या देशातील २४४ जिल्हयांसाठी ४ मे २०१८ रोजी राष्ट्रीय
परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील १५ जिल्हयांचा समावेश आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने
‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २४४ जिल्हयांसाठी दिल्लीत एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
करण्यात आले आहे. केंद्रीय महिला व
बालकल्याण मंत्री मनेका गांधी या परिषदेच्या मुख्य अतिथी तर केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ.
विरेंद्र कुमार प्रमुख अतिथी असतील. या मंत्रालयाचे सचिव
राकेश श्रीवास्तव हे ‘बेटी पढाओ बेटी बचाव”
कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती देतील. केंद्रीय आरोग्य
व कुटुंब कल्याण मंत्रालय व मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही मुलींचे
आरोग्य व शिक्षणाबाबत शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन
करतील. या परिषदेत विविध राज्यांचे महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव,
जिल्हाधिकारी, राज्य समन्वयक,जिल्हा
समन्वय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सातारा,
धुळे, नांदेड,अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे,
नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी आणि नंदुरबार या जिल्हयांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय महिला व
बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी २०१५ मध्ये ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमाची
सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत देशात आतापर्यंत १६१ जिल्हयांमध्ये या
योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून राज्यातील १६ जिल्हयांचा यात समावेश आहे. या
अंतर्गत बीड, जळगाव, अहमदनगर,बुलडाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद,
सांगली, जालना, हिंगोली, सोलापूर, पुणे,परभणी, नाशिक आणि लातूर जिल्हयांमध्ये या
कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांनी राजस्थानातील झुनझुन येथे यावर्षी जागतिक महिला दिनी घोषणा करत ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमाचा विस्तार करून
देशातील ६४० जिल्हयांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने देशातील २४४ जिल्हयांची निवड केली. या
जिल्हयांमध्ये ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’
कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शुक्रवार
४ मे २०१८ रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण २४४
जिल्हयांमध्ये महाराष्ट्रातील १५ जिल्हयांचा समावेश आहे. उर्वरीत २३५
जिल्हयांमध्ये प्रसारामाध्यमे व अन्य माध्यमांद्वारे प्रचार मोहिम आखून हा
कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment