राष्ट्रीय परिषदेत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मागणी
नवी दिल्ली, 14 : केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्यमान भारत योजने’साठी केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज केली.
केंद्रीय कुटुंब कल्यण व आरोग्य मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात ‘आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजने’बाबत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस विविध राज्यांचे आरोग्यमंत्री, केंद्र व राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची भाषणे झाली. महाराष्ट्राच्यावतीने बोलताना डॉ.सावंत म्हणाले, राज्यात सध्या ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ सुरू असून 2 कोटी 23 लाख जनतेला या योजनेच्या माध्यमातून आरोग्य विमा व सेवा पुरविण्यात येतात. केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्यमान भारत’ योजनेची राज्यात अंमलबजावणी करताना ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या 1 लाख 50 हजारांच्या विमा सुरक्षेपेक्षा जास्त म्हणजे 5 लाख रूपयांचे सुरक्षा कवच पुरविण्यात येणार आहे. ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी 40 टक्के निधी राज्याने उभारायचा असून उर्वरित 60 टक्के निधी केंद्रशासन उपलब्ध करून देणार आहे. मात्र, केंद्राच्या वाटयाशिवाय राज्याच्या आरोग्य विभागासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी केंद्र शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी डॉ.सावंत यांनी यावेळी केली.
‘आयुष्यमान भारत’ योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या 1300 सेवांपैकी नैसर्गिक बाळंतपण, सिजेरियन व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी सेवा राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयांमध्ये पुरविण्यात येत असल्याने या सेवांना ‘आयुष्यमान भारत’ मधून वगळण्यात यावे अशी सूचनाही डॉ.सावंत यांनी यावेळी केली.
००००
रितेश भुयार/वृ वि क्र 230/ दिनांक 14.06.2018
No comments:
Post a Comment