नवी दिल्ली, दि. 29: महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन शौर्य’ अंतर्गत एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्री मोदी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांचे अनुभव ऐकून भविष्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते.
राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नुकतीच भेट घेतलेल्या महाराष्ट्रातील या एव्हरेस्टविरांनी प्रधानमंत्री यांचे निवासस्थान ७, लोक कल्याण मार्ग येथे आज प्रधानमंत्री यांची भेट घेतली. मनीषा धुर्वे ,कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम आणि प्रमेश आडे या धाडसी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट यशस्वी सर करण्याचे आपले अनुभव प्रधानमंत्री यांना सांगताना मनमोकळया गप्पा मारल्या. या विद्यार्थ्यांचे एव्हरेस्ट सफरीतील किस्से जाणून घेतानाच प्रधानमंत्री यांनी या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. तसेच, त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा , चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील व एव्हरेस्ट वारीसाठी निवड झालेले इंदू कन्नाके, अक्षय आत्राम, शुभम पेंदोर, छाया आत्राम आणि आकाश मडावी हे ही यावेळी उपस्थित होते .
राज्यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटकपणा व साहसीवृत्तीला वाव मिळावा यासाठी 'मिशन शौर्य' ची आखणी करण्यात आली होती.
दरम्यान, या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. विशेषतः भारतनेट प्रकल्पांतर्गत महानेट हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत असून त्यामाध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा कसा बदलता येईल याबाबतचे पत्रही त्यांनी दिले.
00000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 246/ दिनांक 29.6.2018
No comments:
Post a Comment