नवी दिल्ली, १२ :
स्वच्छ व सुंदर रेल्वे
स्थानकांच्या स्पर्धेत देशात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे
स्थानकांना आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सन्मानीत
करण्यात आले.
रेल्वे स्थानक परिसरात कलात्मकतेचा उपयोग करून स्वच्छतेला प्रोत्साहन
देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने ‘स्वच्छ व सुंदर रेल्वे स्थानक’ या संकल्पनेवर आधारीत स्पर्धेच्या
विजेत्यांना आज रेल्वे मंत्री श्री. गोयल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रेल्वे भवनात
आयोजित या कार्यक्रमास रेल्वे
राज्य मंत्री राजेन गोहेन व रेल्वे बोर्डचे
अध्यक्ष अश्विनी लोहानी उपस्थित
होते.
‘स्वच्छ व सुंदर’ रेल्वे स्थानकाच्या स्पर्धेत देशातील ११ रेल्वे विभागांतून
६२ रेल्वे स्थानकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत
महाराष्ट्रातील बल्लारपूर व चंद्रपूर रेल्वे स्थानकांनी पहिला क्रमांक मिळवत देशातील
सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळविला. या समारंभात रेल्वे मंत्री श्री. गोयल
यांनी या दोन्ही रेल्वे स्थानकांना पुरस्कार प्रदान केला. नागपूर येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट ॲण्ड डिझाईनचे प्राध्यापक व प्रकल्प अधिकारी विनोद मानकर, प्रा.
प्रफुल्ल नायसे आणि प्रा. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांनी पुरस्कार स्वीकारला. या दोन्ही स्थानकांना
संयुक्तपणे १० लाख रूपये , प्रशस्तीपत्र पुरस्कार
स्वरूपात प्रदान करण्यात आले. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनाही यावेळी
प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नागपूर मध्य रेल्वेचे अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक
त्रिलोक कोठारी उपस्थित होते.
राज्याचे अर्थ व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील या
स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय झाला. वर्षभरापूर्वी याठिकाणी नागपूरच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट ॲण्ड डिझाईनचे ६ प्राध्यापक व ५ विद्यार्थ्यांच्या
चमुने चित्र रेखाटनास सुरुवात केली. आदिवासींच्या लोककला आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवाच्या
वैभवाला या चित्रकारांनी आकार दिला. बघता बघता चंद्रपूर आणि बल्लारपूर
रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला. या रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला वन्यजीवांचे
चित्र आकर्षून घेते. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर साक्षात ताडोबा मधील पराक्रमी वाघ
पायऱ्यांवर साकारला असून हा एक सेल्फी पॉईंट झाला आहे.
आजच्या
पुरस्कार वितरण समारंभात बिहार मधील समस्तीपूर विभागातील मधुबनी रेल्वे स्थानक आणि
तामीळनाडुतील मदुराई रेल्वे स्थानकांना संयुक्तपणे दुसरा क्रमांकाचा पुरस्कार
प्रदान करण्यात आला. गुजरात मधील गांधीधाम, राजस्थानातील कोटा आणि तेलंगणातील
सिकंदराबाद रेल्वे स्थानकांना संयुक्तपणे तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
******
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२५८/
दिनांक १२.०७.२०१८
No comments:
Post a Comment