नवी दिल्ली, 23:
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सेवा पोहचतील या ध्येयाने कार्यरत
राहून सनदी अधिका-यांनी सदैव मदतीचा भाव ठेवावा असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे केले.
‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने येथील माळवणकर सभागृहात
आयोजित ‘केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा- गुणवंताचा
कौतुक सोहळा व नवीन विद्यार्थ्यांना मार्गदशन’ या
कार्यक्रमात श्री.जावडेकर बोलत होते. यावेळी ‘पुढचे पाऊल’ संस्थेचे संस्थापक तथा विदेश
मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे व
गुणवंत विद्यार्थी मंचावर उपस्थित होते.
श्री.
जावडेकर म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रत्यक्षात कार्य करताना सनदी
अधिका-यांनी समाजमन जाणून घेणे महत्वाचे असते. त्यासाठी प्रत्येक सनदी अधिका-याचे ह्दय
समाजसेवकाचे असावे. समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्यांची जाण अधिका-याला असावी. उत्तम
सनदी अधिका-याने कर्तव्य कठोरता व प्रामाणिकता हे गुण अंगी बाळगतांनाच पदाचा
अहंकार टाळावा असा मोलाचा सल्ला श्री.
जावडेकर यांनी दिला.
प्रतिभेला
मेहनत व शिस्तीची जोड आवश्यक
यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी
करणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. जावडेकर म्हणाले, या परिक्षेसाठी
नव्या ऊर्जेने अभ्यासाला लागा व प्रतिभेला मेहनत आणि शिस्तेची जोड द्या. प्रत्येक
विद्यार्थी हा प्रतिभावान असतो मात्र, इच्छित यश मिळविण्यासाठी मेहनत आणि शिस्तही
असणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यास करतांना विषय समजून घेणे व तो समजावून सांगता येणे
आणि त्या विषयाचे उचित विश्लेषण करणे या बाबींवर लक्ष दिल्यास अभ्यास सुकर होतो.
महाराष्ट्रातील विद्यार्थी मेहनती आहेत अस सांगून, या विद्यार्थ्यांनी यशवंत व
किर्तीवंत व्हावे अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
गुणवंतांचा
सन्मान
या कार्यक्रमात वर्ष 2016 -17 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 30 गुणवंत
विद्यार्थ्यांचा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष
भामरे,खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सन्मान
करण्यात आला. यावेळी मुळचे महाराष्ट्रातील व केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये
कार्यरत अधिकारी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची
राजधानी दिल्लीत तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित
होते.
तत्पूर्वी, केंद्रीय
लोकसेवा आयोगाची परीक्षा’ उत्तीर्ण झालेल्या मोनिका घुगे
यांनी ‘युपीएससी पूर्व परिक्षेच्या तयारीबाबत’ उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘मुख्य परिक्षेच्या
तयारीसाठी अभ्यासाचे तंत्र’ या विषयावर सुयश चव्हाण यांनी,
‘मुख्य परिक्षेतील उत्तर लिखान’ या विषयावर
प्रणय कानिटकर, ‘निबंध लेखन’ विषयावर
भुवनेश पाटील, ‘एथिक्स’ विषयावर वैभव गायकवाड यांनी , ‘चालू घडामोडी’ विषयावर सुधीर केकन यांनी तर ‘वेळेचे नियोन’ व ‘वैकल्पीक
विषयांबाबत’ जितेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर
मुलाखतीच्या तयारी बाबात दिग्वीजय
बोडके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा- उत्तीर्ण झालेले
गुणवंत विद्यार्थी व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-या नवीन
विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा कार्यक्रमही पार पडला. उन्मेश वाघ आणि अश्विनी
अढीवरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आम्हाला ट्विटर वर फॉलो
करा http://twitter.com/MahaGovtMic
0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२७४/ दिनांक २३.०७.२०१८
No comments:
Post a Comment