Wednesday, 1 August 2018

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जाती अंताचा सिंध्दात पुढे नेण्याची गरज : माजी आमदार राम गुंडीले








                                                           

नवी दिल्ली, 1 : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून जाती अंताचा सिध्दांत प्रभावीपणे मांडला असून त्यांचा वारसा पुढे नेण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन, लातूर जिल्हयातील हेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम गुंडीले यांनी आज केले.
            लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त  महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात श्री. गुंडीले बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलींद आव्हाड यावेळी  मंचावर उपस्थित होते.
            श्री. गुंडीले म्हणाले, अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवासाच्या शाळेत गेले, त्यांनी मोरबाग गिरणीमध्ये काम करताना प्रतिकूल परिस्थितीत लिखाण केले.  समाजातील दुर्लक्षित विविध जातींचा अभ्यासकरून त्यांच्या व्यथा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात मांडल्या. आपल्या लेखनीतून त्यांनी कर्मसाहित्याचे  घाव घालत जाती अंताचा सिध्दांत मांडला. त्यांनी  मांडलेला  जाती अंताचा सिध्दांत प्रत्येकाने पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जग बदल घालूनी घाव ….’, ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली..’ या शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या रचनाही श्री. गुंडीले यांनी यावेळी सादर केल्या.
                                   अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वैश्विक विचारांना जोडणारे
                         लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय समाजातील शोषितांची दु:ख हे अन्य देशातील शोषितांच्या दु:खासोबत अभ्यासून आपल्या साहित्यातून मांडली आहेत, म्हणूनच त्यांचे साहित्य वैश्विक विचारांना जोडणारे असल्याचे डॉ. मिलींद आव्हाड यांनी आपल्या भाषणात सांगितले. ‘माझा रशियाचा प्रवास’ आणि ‘स्टॅलीन ग्रॅडचा पोवाडा’ या  अण्णाभाऊंच्या रचनांमधून आपल्याला त्यांच्या वैश्विक विचारांची ओळख होते. अण्णाभाऊ यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ व लोकवाड:मयात दिलेल्या योगदानावरही यावेळी डॉ.आव्हाड यांनी प्रकाश टाकला.
            प्रास्ताविक भाषणात दयानंद कांबळे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वाड:मयातून जातीअंताचा लढा उभारला असून  समतेचा संदेश दिला. उपसंपादक रितेश भुयार यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले . 
तत्पूर्वी, महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माजी आमदार राम गुंडीले,  प्राध्यापक डॉ. मिलींद आव्हाड, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार, पत्रकार कमलेश गायकवाड, यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

         महाराष्ट्र सदनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 
            लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला  यांनी  अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, ईशु संधू , राजीव मलिक, यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
                                              ०००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२८/ दिनांक १.०८.२०१८ 



No comments:

Post a Comment