Monday, 13 August 2018

सुलभ जीवन निर्देशांकामध्ये पुणे देशात सर्वोत्कृष्ट




उत्कृष्ट 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 4 शहरे
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी केली घोषणा

नवी दिल्ली दि. 13 : शहरांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून लोकांचे जीवनस्तर उंचाविण्यासाठी प्रथमच सुलभ जीवन निर्देशांकाची (ease of Living Index)  घोषणा केली आहे. यामध्ये पुणे शहर देशात सर्वोत्कृष्ट ठरले असल्याचे आज केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी जाहीर केले.
येथील राष्ट्रीय माध्यम  केंद्रात आज  केंद्रीय मंत्री हरदिप सिंग यांनी सुलभ जीवन निर्देशांकामध्ये असणा-या  प्रथम दहा शहरांची घोषणा केली. यामध्ये प्रथम पुणे तर व्दितीय क्रमांक नवी मुंबई, तृतीय क्रमांक बृहन्मुंबई तर सहाव्या क्रमांकावर ठाणे या राज्यातील चार शहरांची निवड करण्यात आलेली आहे. यासह,  अन्य शहरांमध्ये तिरूपती, चंदीगड, रायपूर, इंदोर, विजयवाडा आणि भोपाळ आहेत.

सुलभ  जीवन निर्देशांकाचे मुल्यांकन हे राष्ट्रीय तसेच जागतिक  स्तरावरील राहण्यायोग्य शहरांच्या आणि शाश्वत विकासाच्या मानांकनाच्या आधारावर करण्यात आलेले आहे.  जून 2017 मध्ये सुलभ जीवन निर्देशांक ठरविण्यात आले होते. 19 जानेवारी 2018 पर्यंत 111 शहरांचे मुल्यांकन करण्यात आले. यामध्ये संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक, भौतिक हे  चार मुख्य निकष लावण्यात आले असून यामध्ये 15 श्रेणींची वर्गवारी आणि 78  संकेतक दिलेले आहेत. या आधारे सुलभ जीवन शहर निर्देशांक ठरविण्यात आले.  

संस्थात्मक आणि सामाजिक या आधारासाठी प्रत्येकी 25 गुण दिलेले आहे. 5 गुण हे आर्थिक आधारासाठी  तर 45 गुण भौतिक आधारासाठी देण्यात आलेले आहेत. निवडलेल्या चार आधारावरील अमलबजावणीसाठी कार्यशाळा देशभरातील राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात घेण्यात आलेल्या होत्या.




संस्थात्मक आधारावरील 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 2 शहरे

संस्थात्मक आधारावर सुलभ जीवन निर्देशाकांमध्ये निवड झालेल्या शहरांमध्ये नवी मुंबई व पुणे ही दोन शहरे महाराष्ट्र आहेत. यासह तिरूपती, करीम नगर, हैद्राबाद, बिलासपूर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, विशाखापट्टनम, ही आहेत. संस्थात्मक निकषासाठी 25 गुणाकंन निर्धारित केलेले होते.

सामाजिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील 4 शहरे

सामाजिक आधारावर निवड झालेल्या निर्देशाकांमध्ये राज्यातील नवी मुंबई, पुणे, बृहन्मुंबई, वसई-विरार या 4 शहरांचा समावेश आहे. यासह तिरूपती, तिरूचिरापल्ली, चंदीगड, अमरावती, विजयवाडा, इंदोर, या शहरांचा समावेश आहे. सामाजिक आधारावरील निकषासाठी 25 गुणाकंन देण्यात आले होते.

आर्थिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये 2 शहरे राज्यातील

आर्थिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील पुणे आणि ठाणे या  2 शहरांचा सामवेश झालेला आहे. यामध्ये चंदीगड, अजमेर, कोटा, इंदोर, त्रिरूप्पुर, इटानगर, लुधियाना, विजयवाडा, या अन्य शहरांची निवड करण्यात आलेली आहे. आर्थिक आधारासाठी 5 गुणाकंन देण्यात आलेले होते.

भौतिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील सर्वाधिक 4 शहरे

        भौतिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील बृहन्मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई या चार शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. यासह चंदिगड, रायपूर, तिरूपती, भोपाल, बिलासपूर, विशाखापट्टनम या शहरांचा समावेश आहे. भौतिक आधारावर  निवडण्यासाठी 45 गुणाकंन देण्यात आलेले होते.

याशिवाय 40 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक असलेल्या शहरांमध्ये उत्कृष्ट  व्यवस्थापनामध्ये  बृहन्मुंबई, चेन्नई, सूरत या शहरांचा समावेश आहे. 40 लाख लोकसंख्येपर्यतच्या शहरांमध्ये पुणे, नवी मुंबई, ठाणे या शहरांचा सामावेश आहे.

वेगवेगळया मानांकनासाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील राज्यांमधील अन्य शहरांची माहिती डॅशबोर्डवर देण्यात आलेली आहे. डॅशबोर्डसाठी hattps://smartnet.niua.org हे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे. अन्य मानांकनांमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबीवली, नागपूर, अमरावती, नाशिक, पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे.     


No comments:

Post a Comment